मुंबई- साऊथ सुपरस्टार चियान विक्रम (Chiyaan Vikram) लवकरच ‘पोन्नियिन सेल्वन 1’ (PS- 1) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चोल वंशाच्या साम्राज्यावर आधारित ऐतिहासिक कथानक असलेला हा बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटात विक्रम हा आदित्य करिकालन यांची भूमिका साकारतोय. मणिरत्नम (Mani Ratnam) दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीम मुंबईत पोहोचली. मुंबईतील या कार्यक्रमात बोलताना विक्रमने चोल साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख केला. त्याचं हे दोन मिनिटांचं भाषण सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
अमेरिका आणि इंग्लंडसारख्या देशांचं सतत कौतुक करणाऱ्या लोकांच्या डोळ्यांत अंजन घालणारा हा व्हिडीओ असल्याचं काही नेटकरी म्हणतायत. “आपण पिरॅमिट पाहतो, पीसाची झुकलेली इमारत पाहतो. आपण अशा इमारतींचं कौतुक करतोय जी सरळ उभी नाही, जी एका बाजूला झुकलेली आहे. तिथे जाऊन आपण सेल्फी काढतो. पण आपल्या देशात पुरातन काळात अशी मंदिरं बांधलेली आहेत, ज्यांच्या बांधकामात प्लास्टरचाही वापर झाला नाही”, असं विक्रम या व्हिडीओत म्हणताना दिसतोय.
VERA LEVELLL!
This could probably be the best promotional material about #PonniyinSelvan and it doesn’t say a word about the film in particular.
Chiyaan VIKRAM ??
— Siddarth Srinivas (@sidhuwrites) September 24, 2022
तंजावूरच्या बृहदेश्वर मंदिराबद्दल बोलताना विक्रम पुढे म्हणाला, “कोणत्याही क्रेनचा वापर न करता याठिकाणी अनेक टन वजनाची दगडं आणली गेली. त्यासाठी सहा किलोमीटरचा रॅम्प बनवला गेला होता. या मंदिराने आतापर्यंत सहा भूकंप झेलले आहेत.” ग्रॅनाइटने बनवलेलं हे संपूर्ण जगातील एकमेव मंदिर आहे.
राजा चोझान यांच्या कामगिरीबद्दलही विक्रम या भाषणात बोलताना दिसतोय. “सम्राटने त्यावेळी 5000 धरण बांधले होते, लोकांना कर्ज दिलं, मोफत रुग्णालये चालवली, पंचायत निवडणुका घडवल्या आणि शहरांना महिलांची नावं दिली. हे 9 व्या शताब्दीत घडलं होतं. त्याकाळी आपली समुद्री शक्ती ही बाली आणि मलेशियापर्यंत पोहोचली होती. आपली संस्कृती किती महान आहे. त्यावर आपल्याला गर्व असायला हवा. उत्तर भारत किंवा दक्षिण भारत अशी कोणती गोष्टच नाही. आपण सर्वजण भारतीय आहोत आणि त्याविषयी आपण गर्व बाळगायला हवा”, असं तो म्हणतो.