‘गीता माँ’ म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूर ही ‘इंडियाज बेस्ट डान्सर 4’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून परतली आहे. गीता आणि कोरिओग्राफर टेरेन्स लुईस हे दोघं 2020 पासून या शोचे परीक्षक आहेत. 2020 मध्येच हा डान्स शो सुरू झाला होता. तिसऱ्या सिझनपासून अभिनेत्री करिश्मा कपूर या दोघांसोबत परीक्षक म्हणून सहभागी झाली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गीताने तिच्याबद्दल होणाऱ्या विविध चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. “तुझ्याबद्दलच्या अशा कोणत्या अफवा आहेत, ज्यामुळे तुला मोठा आश्चर्याचा धक्का बसेल”, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता.
या प्रश्नाचं उत्तर देताना गीताने म्हटलंय, “फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या अनेकांना त्यांच्या संपत्तीविषयीच्या अफवा ऐकू येतात. कुठेतरी लिहिलं होतं की माझ्याकडे कोट्यवधी रुपयांचा बंगला आणि गाड्या आहेत. हे वाचून मला प्रश्न पडतो की कुठे आहे हे सगळं? मलासुद्धा समजलं पाहिजे. हे कोट्यवधी रुपयांचे कार कुठे आहेत, मलासुद्धा ते कार चालवायचे आहेत. कोट्यवधींचे बंगले कुठे आहेत? मलासुद्धा त्यात राहायचं आहे. कोणत्या बँकेत हे कोट्यवधी रुपये आहेत? मलासुद्धा खर्च करायचे आहेत. अशा अफवांचं मला आश्चर्यच वाटतं. आमच्याकडे जी संपत्ती आहे, त्याची माहिती सरकारलाही आहे आणि त्याचा आम्ही करसुद्धा भरतो.”
या मुलाखतीत गीता तिच्या लग्नाविषयीच्या चर्चांवरही व्यक्त झाली. “माझ्याविषयी पसरलेली आणखी एक अफवा म्हणजे मी गुपचूप लग्न केलंय. मी असं काही केलंच नाही. जर माझं लग्न झालं असतं तर ती गोष्ट मी का लपवली असती? मी अभिमानाने सांगितलं असतं की मी विवाहित आहे आणि मला मुलंबाळं आहेत. अशा अफवा आता थांबल्या पाहिजेत.”
गीता कपूरने वयाच्या 17 व्या वर्षी कोरिओग्राफर फराह खानचा ग्रुप जॉईन केला होता. त्यानंतर तिने ‘कुछ कुछ होता है’, ‘दिल तो पागल है’, ‘ओम शांती ओम’, ‘मोहब्बतें’, ‘कल हो ना हो’ यांसारख्या चित्रपटांसाठी फराहसोबत काम केलं. गीता कपूरने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. आता ती बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. गीता 51 वर्षांची असून तिने अद्याप लग्न केलं नाही. मात्र तिचे शिष्य आणि इंडस्ट्रीतील मित्रपरिवार तिला ‘गीता माँ’ या नावानेच हाक मारतात.