अभिनेत्री अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर एकमेकांना डेट करत असल्याचं सर्वश्रुत आहे. जरी या दोघांनी खुलेपणाने माध्यमांसमोर आपलं नातं जाहीर केलं नसलं तरी अनेकदा अनन्या-आदित्यला एकत्र पाहिलं गेलंय. हे दोघं जेव्हा परदेशात फिरायला गेले होते, तेव्हासुद्धा तिथले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता मुलीच्या रिलेशनशिपबद्दल अनन्याचे वडील आणि अभिनेते चंकी पांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रिलेशनशिपच्या बाबतीत अनन्याच्या पसंतीला कोणताच विरोध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे आपल्या 25 वर्षीय मुलीच्या वैयक्तिक आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याचा कोणताच हेतू नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर अनन्याने कोणाच्याही मदतीशिवाय बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केल्याबद्दल त्यांनी तिचं तोंडभरून कौतुक केलंय.
‘लेहरें’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत चंकी यांना अनन्या पांडेच्या रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारला गेला. त्यावर ते म्हणाले, “माझ्या मते ती 25 वर्षांची आहे, ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावतेय. त्यामुळे तिला तिच्या मनानुसार वागण्याचा अधिकार आहे. माझ्या 25 वर्षीय मुलीला काय करायचं आणि काय नाही, हे सांगण्याची मी हिंमत तरी कशी करू? पडद्यावरील तिच्या इंटिमेट सीन्सबद्दलही मला काहीच समस्या नाही. मी हॉलिवूडमध्येही असे सीन्स पाहिले आहेत. यात कोणाचंच काही नुकसान नाही. तुम्हाला या गोष्टी स्वीकाराव्या लागतात.”
अनन्या कधी तुमच्याकडे कोणता सल्ला मागायला आली का, असा प्रश्न विचारल्यावर ते पुढे म्हणाले, “माझ्या दोन्ही मुली भावनाच्या (आई) खूप जवळ आहेत. जेव्हा त्यांना कोणती गरज असते, तेव्हा मला त्यांचा कॉल येतो. पण त्याव्यतिरिक्त दोघी त्यांच्या आईच्या खूप जवळच्या आहेत. त्यांना कधीही कोणत्याही सल्ल्याची गरज असली तर मीसुद्धा त्यांच्यासोबतच असतो. पण चित्रपटांच्या बाबतीत काही बोलायचं झालं, तर आमच्यात नेहमी वाद होतात. कारण त्याबाबतीत माझे विचार जुने आहेत.”
“अनन्याला जेव्हा पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली आणि तो स्विकारण्याचा निर्णय तिने घेतला, तेव्हा तो क्षण माझ्यासाठी खूप अभिमानाचा होता. मला वाटतं त्यांना सुरुवातीला ती खूपच लहान वाटली होती. पण जेव्हा ती ऑडिशनला गेली, तेव्हा तिला ती भूमिका मिळाली. त्यामुळे तिच्या दमावर तिने काम मिळवल्याचा मला खूप अभिमान आहे”, अशा शब्दांत चंकी पांडे त्यांच्या मुलीविषयी व्यक्त झाले.