बेंगळुरू : ‘सीआयडी’ ही टीव्हीवरील सर्वांत लोकप्रिय मालिका होती. या मालिकेत भूमिका साकारणारा प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. ही मालिका बरीच वर्षे चालली असली तरी त्यात काही कलाकार सतत बदलत गेले. असं असूनही अवघे काही वर्षे काम केलेल्या कलाकारांनाही यशस्वी करिअर मिळालं. पण सीआयडीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या एका अभिनेत्याने मालिकेनंतर अभिनयक्षेत्रच सोडलं. या अभिनेत्याने जवळपास सहा वर्षे मालिकेत काम केलं होतं. विवेक माश्रू असं या अभिनेत्याचं नाव असून त्याने सीआयडी या मालिकेत इन्स्पेक्टर विवेकची भूमिका साकारली होती.
विवेकने 2003-05 मध्ये ‘मॉर्निंग रागा’ आणि ‘आँखे’ यांसारख्या दूरदर्शनवरील मालिकांमधून करिअरची सुरुवात केली. ‘अक्कड बक्कड’ या टीव्ही शोसह काही थिएटरीकल प्रॉडक्शन्समध्ये काम केल्यानंतर विवेकला 2006 मध्ये सीआयडी मालिकेत भूमिका मिळाली. मालिकेतील त्याची भूमिका तात्पुरती होती, पण तरीही त्याने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने खुलासा केला की, त्याचा करार फक्त तीन महिन्यांचा होता. पण मालिकेत त्याने तब्बल सहा वर्षे काम केलं. या सहा वर्षांत विवेकची लोकप्रियता चांगलीच वाढली.
सीआयडी या मालिकेत इन्स्पेक्टर विवेकची भूमिका सहा वर्षे साकारल्यानंतर 2012 मध्ये त्याने मालिका सोडली. यावेळी त्याने फक्त मालिकाच नाही तर अभिनयक्षेत्रच सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याने सिंगापूरमधून उच्च शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय व्यवसायात मास्टर्सची पदवी मिळवल्यानंतर विवेकने नोकरी करण्यास सुरुवात केली. 2015 मध्ये तो इंडस इंटरनॅशनल स्कूल्सचा मार्केटिंग डायरेक्टर म्हणून शिक्षण क्षेत्रात काम करू लागला. त्याने काही खासगी विद्यापिठांमध्येही काम केलं होतं.
सध्या विवेक हा बेंगळुरूमधील विद्यापिठात प्रोफेसर म्हणून काम करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. पण हे अर्धसत्यच आहे. बेंगळुरूमधील खासगी संस्था CMR मध्ये तो काम करतो, पण शिक्षक म्हणून नाही. तर विवेक तिथल्या कॉमन कोअर अभ्यासक्रम विभागाचा संचालक आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीतही त्याने याबाबद स्पष्ट केलं. “मला आनंद आहे की ते माझ्याविषयी असा विचार करतात. पण मी विद्यापिठातील संपूर्ण विभागाच्या कार्यावर देखरेख करतो. हे नेतृत्त्वाचं स्थान आहे”, असं तो म्हणाला.