मुंबई : ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ या वेब सीरिजच्या दोन्ही सिझनला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. आता लवकरच या सीरिजचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणाऱ्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स 3’ या वेब सीरिजची कथा काल्पनिक आहे. ही कथा खरी नाही किंवा वास्तव जीवनापासून प्रेरित नाही. मात्र तरीही या सीरिजच्या ट्रेलरमधील अमेय गायकवाडचा एक व्हिडीओ आणि सीरिजची झलक प्रेक्षकांना हा प्रश्न विचारण्यास भाग पाडते की ‘या सीरिजच्या कथेचा ट्रॅक महाराष्ट्रात घडलेल्या सत्ताबदलाच्या घटनांपासून प्रेरित आहे का?’ टीव्ही 9 भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत अभिनेते सचिन पिळगावकर (जग्या) आणि अतुल कुलकर्णी (अमेयराव गायकवाड) यांनी दिलेलं उत्तर पेचात पाडणारं आहे.
सीरिजच्या कथेविषयी अतुल कुलकर्णी म्हणाले, “आम्ही दीड वर्षापूर्वी या सीरिजच्या शूटिंगला सुरुवात केली होती आणि त्याची कथा शूटिंगच्या एक वर्ष आधी लिहिली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मला सतत याची भिती वाटत होती की आमच्या अनेक लेखकांचे श्रेय हिरावून घेतले जाऊ नये. जे घडतंय किंवा घडलंय त्यावरून तुम्ही सीरिजची कथा लिहिली आहे, असं लोकांना वाटू नये. पण झालं नेमकं उलटंच. या राजकारणाने आमच्याकडून प्रेरणा घेतली आहे (हसतात).”
अतुल कुलकर्णींच्या या मुद्द्याला पाठिंबा देत सचिन पिळगावकर म्हणतात, “मला यावर काहीच बोलायचं नाहीये पण आयुष्य हा योगायोग आहे. कालही योगायोग होता आणि आजही योगायोग आहे.”
सिटी ऑफ ड्रीम्सचे पहिले दोन सिझनसुद्धा हॉटस्टारवर प्रदर्शित झाले होते. या दोन्ही सिझनमध्ये कलाकारांची मोठी फौज पहायला मिळाली. नागेश कुकनूर दिग्दर्शित या नाटकात अतुल कुलकर्णी आणि सचिन पिळगावकर यांच्यासोबतच अभिनेत्री प्रिया बापटचीही मुख्य भूमिका आहे. या सीरिजमध्ये सचिन पिळगावकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जगदीश गौरव यांची भूमिका साकारली आहे. गायकवाड कुटुंबासोबत त्यांचं राजकीय वैर असतं. यामध्ये एजाज खान आणि आदिनाथ कोठारे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. आजपासून (26 मे) या सीरिजचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.