अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा पुरविली जाणार आहे. त्याच्या घराबाहेरील सुरक्षासुद्धा वाढवली जाणार आहे. पोलिसांकडून युद्ध पातळीवर आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळेपूर्वीच फोनवरून सलमानशी बातचित केली. फोनवरून मुख्यमंत्र्यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी 15 ते 20 पथकं तयार केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद झाले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत आहेत.
दुसरीकडे या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. गृहमंत्री काय करत आहेत, असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. गोळीबाराच्या घटनेवर बोलताना राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्याबाबतची माहिती आम्हाला मिळेल. आम्हाला जेव्हा अधिक माहिती मिळेल, तेव्हा आम्ही देऊ. यात अटकळबाज्या करण्यात अर्थ नाही.”
“हे महाविकास आघाडीचं सरकार नाही, जिथे उद्योजकांच्या घरासमोर जिलेटीन ठेवणार आणि मग सचिन वाझे त्याचा हिस्सा होणार. असं व्हायला हे काही उद्धव ठाकरे यांचं सरकार नाही. आम्ही जनतेला विश्वास देऊ इच्छितो की राज्यातल्या प्रत्येक नागरिकांची सुरक्षिततेची जबाबदारी आमची आहे,” असं नितेश राणे म्हणाले.
सलमान खानला अनेकदा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली. यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. इतकंच नव्हे तर स्वत: सलमानने अत्यंत महागडी बुलेटप्रूफ गाडीदेखील खरेदी केली होती. सलमानसोबत आणि त्याच्या वांद्रे इथल्या घराबाहेर कडक सुरक्षाव्यवस्था असतानाही रविवारी पहाटे धक्कादायक घटना घडली. सलमानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’बाहेर दोन अज्ञातांनी तीन राऊंड फायरिंग केली. गोळीबारानंतर आरोपी तिथून पळाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नाही.