मुंबई : 27 नोव्हेंबर 2023 | जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे लोककारणी म्हणजे आनंद दिघे. आनंद दिघे यांचा जीवनप्रवास ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस आला. पहिल्या भागाला प्रेक्षकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसऱ्या भागाचं चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चित्रपटाचा शुभारंभ झाला. यावेळी मंचावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
“धर्मवीरच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. पहिल्या भागात आनंद दिघे साहेबांचं व्यक्तिमत्त्व काय, ते कसे जगले, कित्येक कार्यकर्त्यांना, नागरिकांना आणि सर्वधर्मीयांना त्यांनी कसा लळा लावला होता, हे पहायला मिळालं. साहेब प्रत्येकामध्ये होते. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची हिंदुत्वाची भूमिका होती. हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही हे सरकार स्थापन केलं. पण हिंदुत्वाची भूमिका घेताना कधीच इतर धर्मीयांचा दुस्वास किंवा द्वेष केला नाही. देशभक्त आणि राष्ट्रभक्त हे बाळासाहेब ठाकरे यांना आणि दिघे साहेबांनाही प्रिय होते. एखाद्या गरजूला खरीच अडचण असल्यास, ते कसलाच विचार न करता त्याची मदत करायचे. त्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं काम केलं,” असं शिंदे म्हणाले.
“दिघे साहेब गेल्यानंतर झालेला उद्रेकदेखील आपण पाहिला. ते त्यांच्याविषयीचं प्रेम होतं. आजही टेंभी नाक्यावरील आनंदाश्रमासमोरून जाताना आपोआप हात जोडले जातात. अशी श्रद्धा, भक्ती सहजासहजी मिळत नाही. आपलं सर्वस्व दुसऱ्यासाठी वाहून घ्यावं लागतं. तेव्हाच देवत्व प्राप्त होतं. दिघे साहेबांचं काम एवढं मोठं आहे की एका सिनेमात ते मावणार नाही. पहिल्या भागात मी नगरविकास मंत्री होतो आणि आता दुसऱ्या भागात मी मुख्यमंत्री झालेलो आहे. यात दिघे साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे. मी आनंद दिघेंची शिकवण आचरणात आणण्याचा प्रयत्न करतोय,” असंही शिंदे पुढे म्हणाले.
यावेळी चित्रपटाविषयी बोलताना एकनाथ शिंदे यांनी कलाकारांचं कौतुक केलं. “पहिल्या भागाला जवळपास 17 ते 18 पुरस्कार मिळाले. प्रसाद ओकला तर मानलं पाहिजे. दिघे साहेबांशी त्यांचा कुठलाच संपर्क नव्हता, कधी भेटले नव्हते, त्यांना कधी पाहिलंही नव्हतं, तरी दिघे साहेब तुम्हा सगळ्यांना आवडले की नाही? कुठलंही अभिनय करताना त्यात जीव ओतावा लागतो, सर्वस्व अर्पण करावं लागतं. तेव्हाच ती भूमिका यशस्वी होते. म्हणून प्रसाद ओक यांचं अभिनय करावं तितकं थोडं आहे. दिघे साहेबांसोबत जे लोक होते, त्या सर्वांना विचारून प्रसाद ओक यांनी अभिनयात जीव ओतला. या चित्रपटात ज्यांचा ज्यांचा हातभार लागला, त्या सर्वांचे आभार मानायला हवं. अनेकांनी हा चित्रपट हिंदीत बनवण्याची विनंती केली,” असं त्यांनी सांगितलं.
“काहींना सिनेमा खटकला, काही लोकं सिनेमा बघता बघता उठून गेले, काही लोकांना काही सीन्स आवडले नाहीत. पण आता कोणाला आवडो न आवडो, आता आपण फुल फायनल आहोत. तेव्हा काही गोष्टी इच्छेविरोधात कराव्या लागल्या होत्या. त्या गोष्टी प्रवीण तरडेंनाही आवडल्या नव्हत्या,” असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.