अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि सुष्मिता सेन यांनी 1994 मध्ये ‘मिस इंडिया’ या सौंदर्यस्पर्धेत भाग घेऊन आपल्या करिअरची सुरुवात केली. या दोघींमध्ये सुरुवातीच्या काळात तीव्र स्पर्धा असल्याचं म्हटलं जातं. 1994 मध्ये पार पडलेल्या याच ‘मिस इंडिया’ स्पर्धेत अभिनेत्री मानिनी डेसुद्धा टॉप 10 फायनिस्टपैकी एक होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती ऐश्वर्या आणि सुष्मिता यांच्यातील स्पर्धेबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.
आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत मानिनी म्हणाली, “सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे ज्या मुलीला कधीच सुंदर आहेस असं म्हटलं गेलं नाही, तिने देशाच्या नामांकित सौंदर्यस्पर्धेत भाग घेणंच मोठी गोष्ट आहे. यासाठी मी सुष्मिता सेनचे आभार मानते. ती माझ्या पहिल्या पूर्व पतीसोबत काम करत होती. आमची भेट झाली आणि त्यानंतर चांगली मैत्रीसुद्धा झाली. मध्यरात्री 2 वाजता ती मला कविता वाचून दाखवायची. तिच्या कविता समजून घेणाऱ्या काही ठराविक लोकांपैकी मी एक असल्याचं ती सांगायची. तिने मला क्लॅरिजेस हॉटेलजवळ सोडलं आणि मिस इंडिया स्पर्धेसाठी फॉर्म भरायला भाग पाडलं होतं. त्यामुळे 1994 मध्ये मिस इंडियाचा शेवटचा फॉर्म भरणारी मीच होती.”
“जर त्यावेळी सुष्मिता नसली तर मी त्या स्पर्धेत नसते. मला प्रेरणा मिळावी म्हणून देवाने तिला माझ्याकडे पाठवलं होतं. मी खूप छान बोलते हे माझ्यातील सर्वांत सकारात्मक गुण असल्याचं तिने सांगितलं होतं. इथूनच माझ्या प्रवासाची सुरुवात झाली. मी माझ्या आयुष्यात कधी गोव्याला गेले नव्हते. त्यामुळे स्पर्धेनिमित्त तिथे जाण्यासाठी मी खूप उत्सुक होते. तिथे पोहोचल्यावर आम्ही ऐश्वर्या रायला पाहिलं. तेव्हा आमच्या मनात हाच विचार आला की तिच्याशी स्पर्धा करणंच मूर्खपणाचं आहे. ती खूपच चांगली होती. फक्त सुंदरतेच्या बाबत नव्हे तर स्वभावाच्या बाबतही ती खूप चांगली होती. मी मिस कॉन्जेनिअलिटीची स्पर्धा जिंकले तेव्हा तिने माझ्याकडे येऊन सांगितलं की तिने माझ्यासाठी मत दिलं होतं. त्यावेळी दिल्ली आणि मुंबईच्या तरुणींमध्ये बराच वाद होता. तरीसुद्धा तिने माझी बाजू घेतल्याचं पाहून मी थक्क झाले होते”, असं तिने पुढे सांगितलं.
‘मिस इंडिया’च्या स्पर्धेवेळी ऐश्वर्या आणि सुष्मिता यांच्यात वाद असल्याच्या चर्चांवरही मानिनीने उत्तर दिलं. याविषयी तिने स्पष्ट केलं, “त्या दोघींमध्ये असा कोणताच वाद नव्हता. मीडियानेच हे सर्व निर्माण केलं होतं. आम्ही विशीत होतो आणि त्या दोघीही एकमेकींशी आदरपूर्वक वागायच्या. माझ्या माहितीनुसार, त्या दोघींमध्ये कोणताच वाद नव्हता. मीडियाने हा वाद निर्माण केला होता. कारण त्यावेळी सुष्मिताची फारशी चर्चा नव्हती. ऐश्वर्या आधीपासूनच एका नामांकित साबणाच्या ब्रँडची मॉडेल असल्याचं आम्हाला सांगितलं गेलं होतं. त्यामुळे आम्ही त्या स्पर्धेत तिला काय टक्कर देणार असं वाटलं होतं. पण वाद असं काहीच नव्हतं.”