कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या उत्तम आरोग्यासाठी संपूर्ण देशभरातून प्रार्थना होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती (Health Update) सध्या स्थिर आहे. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत दररोज ताजे अपडेट्स समोर येत आहेत. राजू सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते गेल्या 5 दिवसांपासून दिल्लीतील एम्समध्ये दाखल आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तसंच डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनाही त्यांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. राजू यांना आधीपासूनच हृदयाशी संबंधित समस्या आहेत. त्यामुळे त्यांच्या शरीरात आधीसुद्धा 9 स्टेंट टाकण्यात आले आहेत. यापूर्वी दोनदा अँजिओप्लास्टी (Angioplasty) झाल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी होण्याची ही तिसरी वेळ आहे.
राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर लगेचच त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. ट्रेड मिलवर व्यायाम करत असताना राजू श्रीवास्तव यांना अचानक छातीत दुखू लागल्याने ते खाली पडले. सध्या ते एम्सच्या आयसीयू वॉर्डमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीला फोन केला होता. मोदींनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि मदतीचं आश्वासनही दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राजू श्रीवास्तव यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली होती. राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांनीही कुटुंबाला मदतीचं आश्वासन दिलं आहे.