मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. रामनवमीच्या निमित्ताने या चित्रपटाचा नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र आता त्याच पोस्टरवरून दिग्दर्शक ओम राऊत, निर्माते भूषण कुमार आणि कलाकारांच्या विरोधात मुंबईतील साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजय दीनानाथ तिवारी यांनी ही तक्रार दाखल केली असून ते स्वत: सनातन धर्माचे प्रचारक असल्याचं म्हणत आहेत. आदिपुरुषच्या या नव्या पोस्टरने हिंदू धर्मियांच्या भावनाच्या दुखावल्या आहेत, असं तक्रारीत म्हटलंय.
आदिपुरुषच्या नव्या पोस्टरविरोधात मुंबई हायकोर्टाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्या माध्यमातून तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘चित्रपट निर्मात्यांनी हिंदू धर्म ग्रंथ रामचरितमानसमधील पात्रांना योग्य पद्धतीने दाखवलं नाही. या पोस्टरने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत’, असं तक्रारीत म्हटलंय. ही तक्रार भारतीय दंड संहितेच्या कलम 295 (अ), 298, 500, 34 अंतर्गत FIR दाखल करण्याच्या मागणीसह दाखल केली आहे.
‘आदिपुरुष हा चित्रपट हिंदू धर्मियांचा पवित्र ग्रंथ ‘रामचरितमानस’मधील मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या पवित्र ग्रंथाचं अनुसरण सनातन धर्माकडून अनेक युगांपासून होत आहे. हिंदू धर्मात रामचरितमानसमध्ये उल्लेख केलेल्या मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र आणि इतर पूजनीय पात्रांना विशेष महत्त्व आहे,’ असंही तक्रारीत म्हटलं गेलंय.
ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटातील टीझरवरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळीही चित्रपटातील पात्रांच्या लूकवरून विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. इतकंच नव्हे तर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ओम राऊत यांनी चित्रपटात काही बदल करण्यासाठी वेळ घेतला आणि प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. मात्र नव्या पोस्टरमध्येही तसाच लूक दिसल्याने नेटकरी भडकले आहेत. आदिपुरुषच्या नव्या पोस्टरमध्ये सीता मातेच्या भांगेत सिंदूर नाही आणि श्रीराम यांना जानवेशिवाय दाखवण्यात आलंय, अशी तक्रार करण्यात आली आहे. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांनी हे जाणूनबुजून केल्याचंही तक्रारकर्त्यांनी म्हटलंय.
या चित्रपटात अभिनेता प्रभास रामाच्या भूमिकेत तर अभिनेत्री कृती सनॉन सीतेच्या भूमिकेत पहायला मिळतेय. सनी सिंहने लक्ष्मणाची भूमिका साकारली आहे तर देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत आहे. ‘आदिपुरुष’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील कलाकारांचे लूक पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. त्याच्याही लूकवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला होता. सैफ अली खानच्या दाढीची तुलना नेटकऱ्यांनी मुघलांशी केली होती. हा वाद नंतर इतका वाढला की निर्मात्यांना प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली.