अहमदाबाद : ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून देशभरात मोठा वाद झाला. काही राज्यांमध्ये थिएटरमधून हा चित्रपट काढून टाकण्यात आला. तरीसुद्धा बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कामगिरी केली. आता ‘द केरळ स्टोरी’नंतर एका नव्या चित्रपटावरून वाद सुरू झाला आहे. ‘द क्रिएटर : सृजनहार’ (The Creator : Sarjanhar) असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट अहमदाबादमधील ज्या मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित होणार होता, तिथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. या चित्रपटाला गेल्या काही दिवसांपासून विरोध केला जात आहे. यातील कथेवरून काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे.
अहमदाबादच्या मल्टिप्लेक्सबाहेर बजरंग दलाचे कार्यकर्ते जमा झाले आणि ते ‘जय श्रीराम’च्या घोषणा देऊ लागले. यावेळी कार्यकर्त्यांनी असंही म्हटलंय की हिंदू धर्माच्या बचावासाठी आम्ही नेहमी तयार असू. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे. यामध्ये कार्यकर्त्यांच्या हातात भगवे झेडें पहायला मिळत आहेत. जोरजोरात ते ‘जय श्रीराम’ची घोषणा देत आहेत. त्याचसोबत ते या चित्रपटावर बंदीची मागणी करत आहेत.
‘द क्रिएटर : सर्जनहार’ या चित्रपटात सीआयडी फेम अभिनेता दयानंद शेट्टी मुख्य भूमिका साकारत आहे. त्याच्यासोबत शाजी चौधरी रोहित चौधरी, रजा मुराद, नीलू कोहली, अनंत महादेवन आणि आर्या बब्बर यांच्याही भूमिका आहेत. येत्या 26 मे रोजी हा चित्रपट देशभरातील विविध थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन परवीन हिंगोनिया यांनी केलं आहे. तर राजेश कराटे गुरूजी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
#WATCH | Gujarat | Members of Bajrang Dal staged a protest at a multiplex in Ahmedabad on 24th May against the upcoming film, ‘The Creator – Sarjanhar’. The protesters alleged that the film is promoting “love jihad” pic.twitter.com/IYlN5NM7Xx
— ANI (@ANI) May 25, 2023
अदा शर्माची मुख्य भूमिका असलेल्या ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रचारकी असल्याचा आरोप झाला होता. आता ‘द क्रिएटर : सृजनहार’ या चित्रपटावरूनही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या चित्रपटाविषयी निर्माते म्हणाले, “मी कोणत्याच धोक्याला घाबरत नाही. त्यांना त्यांच्या धर्मावर प्रेम आहे आणि या गोष्टीशी माझं काही घेणं-देणं नाही. मी सर्व धर्मियांना विनंती करतो की त्यांनी धर्माच्या नावावरून दंगल किंवा हिंसा करू नये. तुम्ही धर्माच्या रक्षणासाठी एखाद्या व्यक्तीला मारता का? धर्माला मारा आणि माणुसकीला जपा.”
या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल बोलायचं झाल्यास, यात वेगवेगळ्या धर्माच्या तरुणांची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. या व्यक्तीभोवती या चित्रपटाची कथा फिरते तो धर्माची भिंत तोडून मानवतेच्या दृष्टीकोनातून लोकांची परीक्षा घ्यायचं ठरवतो. लोकांनी धर्म विसरून फक्त प्रेम करावं, अशी त्याची इच्छा असते. मात्र हा चित्रपट सध्या हिंदू संघटनांच्या निशाण्यावर आहे. चित्रपटावरून झालेल्या वादाचा चांगला परिणाम ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरळ स्टोरी’च्या कमाईवर झाला. त्यामुळे आता ‘द क्रिएटर : सृजनहार’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं.