नवी दिल्ली | 10 नोव्हेंबर 2023 : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा यांच्या अडचणी मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जयाप्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी जयाप्रदा यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात अल्याची मोठी माहिती समोर येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जयाप्रदा यांची चर्चा रंगली आहे. 2019 मध्ये जयाप्रादा यांच्यावर स्वार कोतवाली, रामपूर येथे आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकणी एमपी-एमएलए न्यायालयात सुनावणी सुरु आहे. याप्रकरणी न्यायालयाने जयाप्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. पुढील सुनावणीची 17 नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
जयाप्रदा यांनी भाजपच्या तिकिटावर रामपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. निवडणूकीत जयाप्रदा यांना अपयशाचा सामना करावा लागला होता. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतरही त्यांनी 19 एप्रिल रोजी नूरपूर गावात रस्त्याचं उद्घाटन केलं होतं. कार्यक्रमाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
आचारसंहिते दरम्यान जयाप्रदा यांनी रस्त्याचं उद्घाटन केल्याची माहिती प्रभारी अधिकारी नीरज पाराशरी यांनी पोलिसांना दिली होती. त्यामुळे जयाप्रदा यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली. संबंधीत प्रकरणाची पूर्ण चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं होतं.
जयाप्रदा यांच्या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी रामपूर येथील एमपी-एमएलए न्यायालयात सुरु आहे. साक्ष प्रक्रियेनंतर जयाप्रदा यांना न्यायालयात त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी बोलावण्यात आलं, मात्र त्या न्यायालयात हजर झाल्या नाहीत. बुधवारी देखील त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं. पण जया प्रदा न्यायालयात हजर राहिल्या नाहीत.
न्यायालयात हजर न राहिल्यानंतर जयाप्रदा यांच्याविरोधात न्यायालायने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी १७ नोव्हेंबरला होणार आहे. म्हणून जयाप्रदा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी आता पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.