अभिनेत्री करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘क्रू’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच त्याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. म्हणून ‘क्रू’ची अॅडव्हान्स बुकिंगसुद्धा चांगली झाली आहे. शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक-समिक्षकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियावर अनेकांनी चित्रपटाबद्दल चांगले रिव्ह्यू लिहिले आहेत. अशातच या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली आहे.
‘क्रू’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट होता. या कॉमेडी ड्रामामध्ये करीना, तब्बू आणि क्रिती यांनी एअर होस्टेसच्या भूमिका साकारल्या आहेत. या तिघींच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटाने शुक्रवारी पहिल्या दिवशी 8.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. बऱ्याच समिक्षकांनी ‘क्रू’ला तीन आणि त्यापेक्षा जास्त स्टार्स दिले आहेत. त्यामुळे सकारात्मक रिव्ह्यूचा परिणाम पुढे बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही होऊ शकतो. IMDb वरही या चित्रपटाला चांगली रेटिंग मिळाली आहे. प्रेक्षकांनी IMDb वर या चित्रपटाला 10 पैकी 9.4 रेटिंग दिली आहे.
लाँग वीकेंडचा फायदा उचलत निर्मात्यांनी ‘क्रू’ हा चित्रपट प्रदर्शित केला. त्याचाच पूर्ण फायदा चित्रपटाच्या कमाईला झाला आहे. शुक्रवारी ‘गुड फ्रायडे’ची सुट्टी होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये चांगली गर्दी केली होती. शनिवारी आणि रविवारीसुद्धा चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. या चित्रपटाचा बजेट जवळपास 40 ते 50 कोटी रुपयांचा असल्याचं कळतंय. त्यामुळे ही रक्कम अवघ्या काही दिवसांत भरून निघेल, असं दिसतंय.
‘क्रू’ या चित्रपटात तीन एअरहोस्टेसची कहाणी दाखवण्यात आली आहे, ज्या दिवाळखोरीत निघालेल्या एअरलाइन कंपनीत काम करत असतात. या तिघी जणी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात विविध समस्यांमध्ये अडकल्या आहेत. अशातच एअरलाइन कंपनीत काम करूनही त्यांना पगार वेळेवर मिळत नाहीये. परिस्थिती जेव्हा या तिघींना चुकीचं काम करायला भाग पाडते, तेव्हा कथेत रंजक वळण येतं.
‘क्रू’ या चित्रपटात तब्बू, करीना आणि क्रिती सनॉनशिवाय दिलजीत दोसांझ, कॉमेडियन कपिल शर्मा, शाश्वता चॅटर्जी, राजेश शर्मा आणि कुलभूषण खरबंदा यांच्याही भूमिका आहेत. बालाजी टेलीफिल्म्स आणि अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन्स नेटवर्कने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर ‘लुटकेस’ फेम दिग्दर्शक राजेश ए. कृष्णन या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.