मुंबई : झगमगत्या विश्वातील ग्लॅमर प्रत्येकाला आवडतो. पण या दुनियातील प्रत्येकाचा भूतकाळ अत्यंत संघर्षम आहे. अनेक वाईट गोष्टी मनाच्या एका कोपऱ्यात ठेवून, कलाकार सर्वांसमोर आनंदी असल्याचा देखावा करतात. अभिनेत्री डेझी ईराणी यांच्यासोबत घडलेली घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. वयाच्या ६ वर्षी त्यांच्यावर बलात्कार झाला, पण यातलं काहीही त्यांच्या आईला ठाऊक नव्हतं.
डेझी ईराणी प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि फिल्म मेकर फराह खान यांच्या जवळच्या नातेवाईक आहेत. डेझी यांनी त्यांच्या करियरची सुरुवात १९५० मध्ये केली. लहानपणीचं डेझी यांना प्रसिद्धी मिळाली. पण खऱ्या आयुष्यात मात्र त्या प्रचंड दुःखी होत्या. त्यांच्यासोबत घडलेल्या गोष्टीचा आपण अंदाज देखील लावू शकत नाही.
वयाच्या ६ व्या वर्षी डेझी यांच्यावर बलात्कार झाला होता. एका मुलाखतीत त्यांनी घडलेली घटना सांगितली. त्या म्हणाल्या, ‘ज्या व्यक्तीने माझ्यावर बलात्कार केला, ती व्यक्ती माझी केअरटेकर होती. तो माझ्यासोबत ‘हम पंछी एक डाल के’ सिनेमाच्या शूटसाठी आला होता. तेव्हा एका हॉटेलमध्ये त्याने माझ्यासोबत हिंसा केली. त्याने मला बेल्डने मारलं. एवढंच नाही, तर त्याने मला धमकावलं.
डेझी पुढे म्हणाल्या, ‘बलात्कार केल्यानंतर त्याने मला जीवे मारण्याची धमकी केली. तो व्यक्ती आता या जगात नाही. पण ते क्षण आठवले तरी मला आजही भीती वाटते. त्या रात्री घडलेल्या घटनेनंतर मी दुसऱ्या दिवशी सकाळी सेटवर पोहोचली. काही झालच नाही असे माझे भाव माझ्या चेहऱ्यावर होते.’
‘माझ्या आईला मला काहीही झालं तरी अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून द्यायची होती… घडलेली घटना आईला सांगण्याची हिंमत माझ्यामध्ये नव्हती. मी जेव्हा १५ वर्षांची झाली तेव्हा माझ्या आईला माझ्यावर झालेल्या प्रसंगाबद्दल माहिती पडलं. तेव्हा तिने मला नक्की काय घडलं याबद्दल विचारलं.’
‘आईने विचारल्यानंतर मी तिला सर्व काही खरं सांगितलं. त्यानंतर आईने माझी माफी मागितली. तो क्षण अत्यंत दुःख पोहोचवणारा होता. ‘ पुढे त्या म्हणाल्या, ‘एखाद्या बालकलाकाराचं आयुष्य फार सोपं नसतं. बालपणी घडलेल्या गोष्टींचा आपल्यावर प्रचंड परिणाम होतो.’ असं देखील डेझी ईराणी म्हणाल्या.