प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरने अभिनेता शालीन भनोतशी 2009 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना जेडन हा मुलगा आहे. मात्र लग्नाच्या सहा वर्षांतच शालीन आणि दलजीत विभक्त झाले. घटस्फोट घेताना दलजीतने शालीनवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. यानंतर गेल्याच वर्षी दलजीतने केन्यातील बिझनेसमन निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं. लग्नानंतर ती मुलगा जेडनला घेऊन केन्यामध्ये राहू लागली होती. मात्र दहा महिन्यांतच ती मुलासोबत भारतात परतली. भारतात आल्यानंतर तिने निखिलवर विवाहबाह्य संबंधाचे आणि लग्नाला मान्यता देत नसल्याचे आरोप केले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दलजीतने शालीनवरही आरोप केले की त्याने गेल्या वर्षभरापासून कोणताच संपर्क साधला नाही. अशातच आता शालीनने त्याच्या दुसऱ्या लग्नाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
‘टेली मसाला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत शालीन म्हणाला, “देवाच्या कृपेने दर दोन-तीन महिन्यांनी माझं कुटुंब वाढतंय. माझी टीम शालीन आहे. मी आणि टीम त्याच्यासाठी काम करतो. हे कुटुंब चांगल्या संख्येने वाढतंय आणि पुढेही चाहत्यांचा आकडा वाढत राहील. लग्नाबद्दल बोलायचं झाल्यास मी वेन्यू, केटरिंग, डेकोरेशन हे सगळं ठरवलंय. फक्त मुलगी शोधायची आहे. ती भेटली की लगेच लग्न करेन (हसतो).” दुसऱ्या लग्नाबद्दल मस्करी केल्यानंतर शालीन पुढे म्हणतो, “मी लग्नाबद्दल कधी विचार केला नाही. माझ्याकडे तेवढा वेळही नाही. कुठे वेळ आहे? लिस्टमधील बऱ्याच गोष्टी अजून बाकी आहेत. देवाची इच्छा असेल तर दुसरं लग्न होईल.”
यावेळी शालीनला लग्नसंस्थेवर विश्वास आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्याने सांगितलं, “अर्थातच माझा लग्नसंस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी माझ्या आईवडिलांना पाहतो, ते एकमेकांसोबत खूप खुश आहेत. आजसुद्धा बाबा आईसाठी गुलाबाचं फूल आणतात आणि आई त्यांना सरप्राइज देत असते. मी लग्नाच्या विरोधात अजिबात नाही. प्रत्येकाने लग्न केलं पाहिजे. पण सतत लग्न करणंही चांगलं नसतं (पुन्हा हसतो). जोडीदार असणं चांगलं असतं. इतरांनीही लग्न करा आणि मला आवर्जून आमंत्रित करा.”
याआधी दिलेल्या एका मुलाखतीत दलजीतने शालीनवर काही आरोप केले होते. “माझ्या पूर्व पतीसोबत गेल्या वर्षभरापासून माझा काहीच संपर्क नाही. कदाचित वर्षभराहून अधिक काळ उलटला असेल. त्यानेही कधीही आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. नऊ वर्षांपर्यंत मी त्याच्यासोबत खूप चांगल्याप्रकारे वागण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा त्याने मुलाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली, मी जेडनला त्याला भेटू दिलं होतं. कारण हे माझ्या मुलासाठी चांगलं असेल असा मी विचार केला. पण नंतर केन्यामध्ये आमच्यासोबत काय घडलं, त्याच्या मुलासोबत काय घडलं याविषयी त्याने जाणून घेण्याचाही प्रयत्न केला नाही. त्याच्याकडे माझा नंबरही असावा, पण त्याने आजवर कॉल किंवा मेसेज केला नाही”, असं दलजीतने म्हटलं होतं.