टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री दलजीत कौर गेल्या काही महिन्यांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पहिलं लग्न अयशस्वी ठरल्यानंतर दलजीतने केन्यातील बिझनेसमन निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं. त्यानंतर ती मुलाला घेऊन केन्याला राहायला गेली. मात्र लग्नाच्या दहा महिन्यांतच ती मुलाला घेऊन भारतात परतली. भारतात आल्यानंतर तिने तिच्या पतीवर विवाहबाह्य संबंधाचे आरोप केले. पतीचं घर सोडून भारतात आल्यापासून दलजीतला अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. ‘मला एका सुटकेसचं आयुष्य जगावं लागतंय’, अशा शब्दांत तिने आपलं दु:ख व्यक्त केलंय. या सर्व परिस्थितीवर मात करून दलजीतला तिच्या मुलासोबत आयुष्याची नव्याने सुरुवात करायची आहे.
दलजीतने तिच्या युट्यूब चॅनलवर नुकताच एक व्लॉग शेअर केला आहे. या व्लॉगमध्ये ती तिच्या संघर्षाविषयी व्यक्त झाली आहे. यात तिने सांगितलं की भारतात तिचं हक्काचं कोणतंच घर नाही. तिने नऊ वर्षे जुनं घर विकल्याचाही खुलासा यात केला. प्रेमात लोक आपल्या आर्थिक स्थितीकडे कशाप्रकारे दुर्लक्ष करतात, याविषयी ती या व्लॉगमध्ये बोलली. मुलासोबत एका सुटकेसमध्ये आयुष्य जगावं लागत असल्याचं तिने म्हटलंय. आपल्या आयुष्यातील कटू आठवणींना आठवून तिला अश्रू अनावर होतात.
“आर्थिक स्थितीमुळे मी माझं नऊ वर्षे जुनं घर विकलंय. त्या घरात माझ्या अनेक आठवणी होत्या. त्या घरातली प्रत्येक गोष्ट मी स्वत: बनवली होती. आता माझ्याकडे ते घरसुद्धा राहिलं नाही. मात्र तरीसुद्धा मी खचणार नाही. मला माझ्या मुलासोबत एका नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे. आता याच एका सुटकेसपासून आमचं एक नवीन आयुष्य सुरू होतंय. त्यामुळे हाच सुटकेस घेऊन मी संपूर्ण जग फिरणार आहे”, असं दलजीत म्हणाली.
या व्लॉगमध्ये दलजीतने असंही सांगितलंय की या संपूर्ण परिस्थितीत तिला तिच्या कुटुंबीयांकडून साथ मिळत आहे. त्याचप्रमाणे तिला मुंबईत घर शोधण्याची घाईसुद्धा करायची नाहीये. “मला मुंबईत भाड्याने सहज एखादा फ्लॅट मिळेल. पण आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलला आहे. मला माझं आयुष्य नव्याने जगायंच आहे”, असं ती पुढे म्हणाली.
दलजीतबद्दल निखिल एका मुलाखतीत म्हणाला होता, “यावर्षी जानेवारी महिन्यात दलजीतने मुलाला घेऊन भारतात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही तिथेच विभक्त झालो. आमच्या या मिश्र कुटुंबाचा पाया तितका मजबूत बनू शकला नाही जितकी आम्हाला अपेक्षा होती. दलजीतला केन्यामध्ये राहायला जमत नव्हतं.”