प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरने गेल्या वर्षी मार्च महिन्यात केन्यातील बिझनेसमन निखिल पटेलशी मुंबईत धूमधडाक्यात लग्न केलं. या लग्नानंतर ती मुलगा जेडनसोबत केन्याला स्थायिक झाली होती. मात्र त्यानंतर काही महिन्यांतच दलजीत आणि निखिल यांच्या नात्यात समस्या निर्माण होऊ लागल्या. अखेर लग्नाच्या दहा महिन्यांतच दलजीत तिच्या मुलाला घेऊन भारतात परतली. भारतात आल्यानंतर तिने निखिलवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नव्हे तर निखिलने लग्नाला मान्यता देण्यास नकार दिल्याचंही तिने म्हटलंय. या सर्व आरोपांवर अखेर निखिलने मौन सोडलं आहे.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत निखिल म्हणाला, “यावर्षी जानेवारी महिन्यात दलजीतने मुलाला घेऊन भारतात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही तिथेच विभक्त झालो. आमच्या या मिश्र कुटुंबाचा पाया तितका मजबूत बनू शकला नाही जितकी आम्हाला अपेक्षा होती. त्यामुळे दलजीतला केन्यामध्ये राहणं जमत नव्हतं. मार्च 2023 मध्ये आम्ही मुंबईत भारतीय विवाहपद्धतीनुसार लग्न केलं. या विवाहाला सांस्कृतिक मान्यता असली तरी ते कायदेशीररित्या बंधनकारक नाही. त्या सोहळ्याचा हेतू हाच होता की दलजीत माझ्यासोबत केन्याला शिफ्ट होणार असल्याचं आश्वासन तिच्या कुटुंबाला मिळावं. आमच्या अनेक प्रयत्नांनंतरही दलजीतसाठी केन्यामध्ये राहणं खूप आव्हानात्मक झालं होतं. तिला भारतातील तिच्या करिअरची आणि आयुष्याची खूप आठवण येत होती. त्यामुळे वैवाहिक आयुष्यातील ही गुंतागुंत वाढतच गेली.”
“सांस्कृतिक विविधता, एकमेकांची मूल्ये आणि विश्वास या सर्व गोष्टींमध्ये भिन्नता असल्याने दिवसेंदिवस आमच्या नात्यासाठी हे नवीन आव्हान ठरत होतं. दलजीतने ज्यादिवशी केन्यामधून निघून जाण्याचा निर्णय घेतला, त्याच दिवशी तिने मला, तिच्या मुलाच्या शाळेत आणि इतरांना कळवलं होतं. तिचं बाकीचं सामान घेण्याशिवाय तिला परत केन्याला यायचंच नव्हतं. मी तिचं सर्व सामान सुरक्षितरित्या ठेवलं आहे. तिचं निघून जाणं हे माझ्यासाठी आमच्या नात्याचा शेवटच होता. पण सोशल मीडियावर पोस्ट लिहून तिने माझ्यावर जे आरोप केले, त्यामुळे माझ्या कुटुंबाला आणि मित्रमैत्रिणींना विनाकारण शोषणाला सामोरं जावं लागतंय. तिने तिच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. तिने तिचं हे वागणं थांबवावं अशी माझी अपेक्षा आहे,” असं तो पुढे म्हणाला.
इतकंच नव्हे तर निखिलने दलजीतला तिच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही कुटुंबीयांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी गोष्टी स्पष्ट केलेल्या बऱ्या, असं त्याने सांगितलं.