प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे सतत चर्चेत राहिली. केन्यातील बिझनेसमन निखिल पटेल याच्याशी अवघ्या दहा महिन्यांतच संसार मोडल्याने दलजीत 2024 मध्ये वर्षभर चर्चेत होती. 2023 मध्ये निखिलशी लग्न करण्यापूर्वी दलजीने अभिनेता शालीन भनोतशी लग्न केलं होतं. या दोघांना जेडन हा मुलगा आहे. मात्र शालीनसोबतचाही तिचा संसार 2015 मध्ये मोडला. त्यावेळी दलजीतने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दलजीत शालीनसोबतचं लग्न आणि घटस्फोटाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.
शालीनसोबतच्या लव्ह-स्टोरीबद्दल दलजीत म्हणाली, “शालीन आणि मी ‘कुलवधू’ या मालिकेत एकत्र काम केलं. त्यानंतर आम्ही नच बलिए या डान्स शोमध्ये भाग घेतला होता. तोपर्यंत सर्वांना हे माहीत झालं होतं की आम्ही एकमेकांना डेट करतोय. अर्थातच आम्ही प्रेमात होतो आणि आम्ही लग्न करणार हे सगळ्यांनाच समजलं होतं. नच बलिए या शोनंतर काही महिन्यांतच आम्ही लग्न केलं. शालीनला भेटले तेव्हा मी दोन शोजमध्ये काम करत होते. त्यामुळे आम्ही क्वचितच कॉफीसाठी एखादा तास भेटायचो. तो डेटिंगचा काळ पण एकमेकांना जाणून घेण्याविषयी कमी आणि एकमेकांसोबत वेळ अधिक घालवण्याचा होता. आम्हाला एकमेकांसोबत फार वेळ घालवता आला नाही. शालीनविषयी जाणून घ्यायला किंवा त्याला ओळखायला जर मला तो वेळ मिळाला असता, तर कदाचित पुढच्या गोष्टी झाल्या नसत्या.”
शालीनसोबत घटस्फोटानंतरचा काळ दलजीतसाठी अत्यंत कठीण गेला. याविषयी तिने पुढे सांगितलं, “पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर मी जवळपास नऊ वर्षे रिलेशनशिपलाही घाबरत होते. एक आनंदी कुटुंब कसं असतं, हेच मी जणू विसरले होते. मी बराच वेळ घेतला. दोन ते तीन वर्षे मला घटस्फोटाचं सत्य स्वीकारायला गेली. मी घटस्फोटाचं दु:ख पचवू शकले नव्हते. मी दिवसरात्र रडत बसायचे. त्यावेळ मुलगा जेडन खूपच लहान होता. सर्वकाही खूप कठीण होतं. त्यावेळी कोणी माझ्यासोबत फ्लर्ट केलं तरी मी चिडायचे, कारण माझ्या मनात मी अजूनही विवाहित असल्याची भावना होती. पण मुलाला एक सर्वसामान्य कुटुंब मिळावं, म्हणून मी अखेर पार्टनरचा शोध सुरू केला. डेटिंग वेबसाइटवर प्रयत्न केले.”
“त्या नऊ वर्षांत शालीन आमच्या संपर्कात होता. असं नव्हतं की तो काही गोष्टींची काळजी घेत होता किंवा निर्णय प्रक्रियेत त्याचा सहभाग होता. पण तो अधून मधून आम्हाला भेटायला यायचा. जेडन आणि त्याचं भेटणं मला योग्य वाटत होतं. कारण कुठेतरी त्याला वडिलांच्या मायेची ऊब मिळत होती. म्हणूनच जेव्हा कधी शालीन मला त्याच्याशी भेटण्याविषयी विचारायचा, मी हो म्हणायचे. पण आज जर तुम्ही शालीनला विचारलंत की जेडन किती वर्षांचा आहे, तरी त्याला उत्तर देता येणार नाही”, अशा शब्दांत दलजीतने नाराजी व्यक्त केली.
अखेर मुलाखातर दलजीतने दुसरं लग्न केल्याचं सांगितलं. “जेडनला वडिलांची खूप गरज होती. तो त्याच्या मित्रांना त्यांच्या वडिलांसोबत बघायचा. त्यामुळे माझ्या दुसऱ्या लग्नाबाबत तो खूप खुश होता. कारण त्याला त्याचे हक्काचे वडील भेटणार होते. मात्र दुसऱ्या लग्नानंतरही जेडनला जे काही पाहावं लागलं, ते खूप वाईट होतं. त्याच्यासाठी मी दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला होता. पण त्यातही मी अपयशी ठरले”, असं दलजीत म्हणाली.