प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरला तिच्या खासगी आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. पहिलं लग्न अयशस्वी ठरल्यानंतर दलजीतने गेल्या वर्षी केन्यातील बिझनेसमन निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं. लग्नानंतर ती पती आणि मुलासह केन्याला राहायला गेली होती. मात्र वर्षभराच्या आतच ती मुलाला घेऊन भारतात परतली. दलजीतने निखिलवर विवाहबाह्य संबंधाचे आरोप केले होते. तर निखिलने दलजीतसोबतचं लग्नच मानण्यास नकार दिला. या सर्व नाट्यानंतर आता निखिलने तिसऱ्यांदा साखरपुडा केल्याचं कळतंय. दलजीतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये निखिलच्या स्टोरीच्या स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या फोटोमध्ये कॉफीचा कप पहायला मिळत असून निखिलच्या हातात सोन्याची अंगठीही दिसत आहे.
दलजीतने हा फोटो शेअर करत निखिल आणि त्याच्या गर्लफ्रेंडला सुनावलंय. ‘शुभेच्छा SN.. सोशल मीडियावर जाहीरपणे दाखवण्याच्या तुमच्या हिंमतीची दाद दिली पाहिजे. निखिल तू अंगठीसुद्धा घातलीस? खूप छान’, अशी उपरोधिक पोस्ट तिने लिहिलं. याशिवाय दलजीतने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक भलीमोठी पोस्टसुद्धा लिहिली आहे. यामध्ये तिने स्पष्ट केलंय की निखिलच्या पार्टनरला ही गोष्ट माहीत आहे की भारतात त्याची पत्नी राहते. त्याचप्रमाणे तिने निखिलला इशारा दिला की भारतीय न्यायिक अधिकारी लवकरच त्याला त्याच्या वैवाहिक स्थितीबद्दल कळवतील. “निखिल त्यांना असंही सांगू शकतो की मी फक्त एक दागिना म्हणून ही अंगठी घातली आहे. पण मला त्याचं खरं रुप, त्याची रणनिती माहित आहे”, असंही तिने म्हटलंय.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत निखिल म्हणाला होता, “यावर्षी जानेवारी महिन्यात दलजीतने मुलाला घेऊन भारतात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही तिथेच विभक्त झालो. आमच्या या मिश्र कुटुंबाचा पाया तितका मजबूत बनू शकला नाही जितकी आम्हाला अपेक्षा होती. दलजीतला केन्यामध्ये राहायला जमत नव्हतं.”
दलजीतसोबतच्या लग्नाबद्दल निखिलने पुढे सांगितलं, “मार्च 2023 मध्ये आम्ही मुंबईत भारतीय विवाहपद्धतीनुसार लग्न केलं. या विवाहाला सांस्कृतिक मान्यता असली तरी ते कायदेशीररित्या बंधनकारक नाही. त्या सोहळ्याचा हेतू हाच होता की दलजीत माझ्यासोबत केन्याला शिफ्ट होणार असल्याचं आश्वासन तिच्या कुटुंबाला मिळावं. आमच्या अनेक प्रयत्नांनंतरही दलजीतसाठी केन्यामध्ये राहणं खूप आव्हानात्मक झालं होतं. तिला भारतातील तिच्या करिअरची आणि आयुष्याची खूप आठवण येत होती. त्यामुळे वैवाहिक आयुष्यातील ही गुंतागुंत वाढतच गेली.”