कोण होती ‘दंगल गर्ल’ सुहानी भटनागर? वयाच्या 19 व्या वर्षी गमावले प्राण

| Updated on: Feb 17, 2024 | 1:58 PM

'दंगल' या चित्रपटात ज्युनिअर बबिता फोगाट साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिच्या निधनाचं वृत्त समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. वयाच्या 19 व्या वर्षी तिने आपले प्राण गमावले आहेत.

कोण होती दंगल गर्ल सुहानी भटनागर? वयाच्या 19 व्या वर्षी गमावले प्राण
Suhani Bhatnagar
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 17 फेब्रुवारी 2024 | आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुहानी भटनागरच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 19 व्या वर्षी सुहानीने या जगाचा निरोप घेतला आहे. ‘दंगल’ चित्रपटात तिने आमिर खानच्या छोट्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूरच होती. आता अचानक सुहानीच्या निधनाचं वृत्त समोर येत आहे. फरीदाबादमध्ये राहणाऱ्या सुहानीच्या निधनाचं कारण तिच्या संपूर्ण शरीरात पाणी भरल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी तिचा एक अपघात झाला होता. या अपघातात तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं. अपघातानंतर उपचारादरम्यान तिने जी औषधं घेतली, त्याचा साइड इफेक्ट होऊन हळूहळू तिच्या शरीरात पाणी भरलं, असं कळतंय. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते.

कोण होती सुहानी भटनागर?

सुहानी बॉलिवूडमधील प्रसिद्ध बालकलाकार होती. तिने 2016 मध्ये आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटात दमदार भूमिका साकारली होती. यामध्ये तिने ज्युनिअर बबिता फोगाटची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने बऱ्याच जाहिरातींमध्येही काम केलंय. ‘दंगल’ या चित्रपटानंतर सुहानीने काही काळ ब्रेक घेतला. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने चित्रपटांचे आणखी ऑफर्स स्वीकारले नव्हते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर काम करणार असल्याचं तिने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं.

हे सुद्धा वाचा

सुहानी भटनागर ही सोशल मीडियावरही फारशी सक्रिय नव्हती. 25 नोव्हेंबर 2021 नंतर तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले नाहीत. मात्र त्यापूर्वी तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. चित्रपटानंतर तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी थक्क झाले होते. सुहानीचा लूक बराच बदलला होता. ‘दंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगच्यावेळी ती 14 वर्षांची होती. पहिल्या चित्रपटातून प्रचंड प्रसिद्धी मिळाल्यानंतरही सुहानीने प्रकाशझोतापासून लांबच राहण्याचा निर्णय घेतला होता.