प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा आणि त्याच्या नऊ सहकाऱ्यांना बेंगळुरू शहर पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतलं आहे. एका हत्येप्रकरणी चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचं कळतंय. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, कामाक्षीपाल्या पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एका हत्येप्रकरणी अभिनेता दर्शन आणि त्याच्या सहकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. या हत्येप्रकरणातील एका आरोपीने दर्शनच्या नावाचा खुलासा केला आहे. दर्शन सतत आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बेंगळुरू पोलीस आयुक्त बी. दयानंद म्हणाले, “9 जून रोजी बेंगळुरूच्या पश्चिम डिव्हिजनमध्ये कामाक्षीपाल्या पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एका हत्येप्रकरणी कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील एका अभिनेत्याला ताब्यात घेतलंय. त्यांची चौकशी सुरू आहे.”
ही कारवाई चित्रदुर्गा इथल्या रेणुकास्वामी नावाच्या एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी झाल्याचं कळतंय. रेणुकास्वामी हे चित्रदुर्गमधील एका मेडिकल शॉपमध्ये असिस्टंट म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रदुर्ग परिसरातून रेणुकास्वामी यांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर शहरातील पश्चिमी भागात असलेल्या कामाक्षीपाल्या इथं त्यांची हत्या करण्यात आली. रेणुकास्वामी यांचा मृतदेह एका नाल्यात आढळला आणि त्यांच्या शरीरावर जखमेच्या काही खुणा होत्या. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने त्याविषयी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
#WATCH | Bengaluru Police Commissioner B. Dayananda says “In connection with a murder case registered in Kamakshipalya Police Station limits of Bengaluru West division on 9th June, one of the actors of Kannada film industry has been secured and he is being questioned. The details… https://t.co/Ze0N8FUNjf pic.twitter.com/s5DVosId9T
— ANI (@ANI) June 11, 2024
‘इंडियन एक्स्प्रेस’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, बेंगळुरू शहर पोलीस आयुक्त बी. दयानंद यांनी सांगितलं की, रेणुकास्वामी हे दर्शनच्या पत्नीला आक्षेपार्ह मेसेज आणि कमेंट पाठवत होता. यामुळेच ही घटना झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. “चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हे प्रकरण लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल”, असं ते म्हणाले.
अभिनेता दर्शन थुगुदीपा अशा पद्धतीने वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी सोशल मीडियावर त्याचा एक ऑडियो व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकात माध्यमांनी त्याच्यावर दोन वर्षे बंदी घातली होती. या ऑडियो क्लिपमध्ये दर्शन एका व्यक्तीवर ओरडताना आणि शिवीगाळ करताना ऐकायला मिळालं होतं. ज्या व्यक्तीवर दर्शन ओरडत होता, ती व्यक्ती माध्यमांमध्ये काम करणारी होती. या प्रकरणानंतर दर्शनने माध्यमांची माफी मागत प्रकरणावर पडदा टाकण्याची विनंती केली होती.