प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि ‘बिग बॉस 17’ या शोचा विजेता मुनव्वर फारूकीने दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. मुनव्वरने हे लग्न गुपचूप उरकलं असून त्याला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. या लग्नानंतर आता पहिल्यांदाच जोडप्याचा फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. मुनव्वरने मेकअप आर्टिस्ट मेहजबीन कोटवालाशी लग्न केलं असून त्यांच्या लग्नानंतर केक कापतानाचा हा फोटो आहे. यावेळी मुनव्वरने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि खाकी रंगाचा पँट परिधान केला आहे. तर मेहजबीनने लॅवेंडर रंगाचा शरारा सेट घातला आहे. मुनव्वरच्या फॅन अकाऊंटवर दोघांचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
मुनव्वर आणि मेहजबीनने 10-12 दिवसांपूर्वीच निकाह केला होता. मात्र सोमवारी त्यांच्या निकाहची बातमी समोर आली. या निकाहला 100 पाहुणे उपस्थित होते. यात कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार होता. लग्नानंतर आयटीसी मराठा हॉटेलमध्ये रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. मेहजबीन ही मेमन समुदायाची असून दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा इथली राहणारी आहे. मात्र मुनव्वर आणि मेहजबीन यांचं हे लव्ह मॅरेज आहे की अरेंज हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एका शूटनिमित्त मुनव्वर आणि मेहजबीन यांची पहिल्यांदा भेट झाली होती.
मुनव्वर आणि मेहजबीन या दोघांनीही अद्याप त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटो पोस्ट केले नाहीत. टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक हिना खानने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये स्वत:चा फोटो पोस्ट करत ‘मेरे यार की शादी है’ हे गाणं बॅकग्राऊंडमध्ये लावलं होतं. त्यावरून तिने मुनव्वरच्या लग्नाला हजेरी लावल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र ज्या सेलिब्रिटींनी या लग्नाला हजेरी लावली होती, त्यांनीसुद्धा सोशल मीडियावर कोणतेच फोटो पोस्ट केले नाहीत.
हे मुनव्वरचं दुसरं लग्न आहे. याआधी त्याचं लग्न झालं असून त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगासुद्धा आहे. मेहजबीनचंही हे दुसरं लग्न असल्याचं समजतंय. ‘बिग बॉस 17’मध्ये मुनव्वर त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना भावूक झाला होता. “माझ्या पूर्व पत्नीने दुसरं लग्न केलंय आणि मुलाचा ताबा मला मिळाला आहे. मुलाचा खर्च आणि त्याच्याविषयीच आमचं कधीतरी बोलणं होतं. त्याशिवाय आम्ही एकमेकांशी काहीच संपर्क ठेवत नाही”, असं तो म्हणाला होता. याआधी मुनव्वरची एक्स गर्लफ्रेंड आयेशा खान आणि नाझिला सिताशी यांनीसुद्धा त्याच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. आयेशा खान ही बिग बॉसच्या 17 व्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणूनही सहभागी झाली होती.