अभिनेत्री दीपिका पादुकोण अनेकदा ‘टॉक्सिक वर्क कल्चर’ आणि ‘वर्क-लाइफ बॅलेन्स’चं महत्त्व (काम आणि आयुष्य यांच्यातील समतोल) यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. गुरुवारी दीपिकाने यावरून थेट एल अँड टी या प्रतिष्ठित कंपनीचे अध्यक्ष एस. एन. सुब्रहमण्यम यांना फटकारलं. सुब्रहमण्यम यांनी कर्मचाऱ्यांना दररोज काम करायला लावण्याचं वक्तव्य केलं होतं. माझ्या कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करावं असं मला वाटतं, असं ते म्हणाले होते. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने यावरून टीका केली आहे. ‘एवढ्या वरिष्ठ पदांवर असलेल्या लोकांना अशी विधानं करताना पाहून धक्का बसतो’, असं तिने म्हटलंय. याचसोबत ‘मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचं’ असल्याचा हॅशटॅग तिने जोडला. फक्त दीपिकाच नाही तर सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी सुब्रहमण्यम यांच्यावर टीका केली. याच्या काही तासांनंतर एल अँड टी कंपनीकडून या वक्तव्याविषयी स्पष्टीकरण देण्यात आलं. मात्र या स्पष्टीकरणावरही दीपिकाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
‘एल अँड टीमध्ये राष्ट्राची उभारणी हा आमचा महत्त्वाचा उद्देश आहे. आठ दशकांहून अधिक काळ आम्ही भारताच्या पायाभूत सुविधा, उद्योग आणि तांत्रिक क्षमतांना आकार देत आहोत. हे भारताचं दशक आहे असं आम्हाला वाटतं. म्हणूनच देशाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या आमच्या दृष्टीकोनाला सत्यात उतरवण्यासाठी सामूहिक समर्पण आणि प्रयत्नांची आवश्यकता आहे. आमच्या अध्यक्षांच्या वक्तव्यात याच मोठ्या महत्त्वाकांक्षेचं प्रतिबिंब होतं. कारण असाधारण निकाल हवे असतील तर त्यासाठी असाधारण प्रयत्न करावे लागतात. एल अँड टीमध्ये आम्ही अशी संस्कृती जोपासण्यासाठी वचनबद्ध आहोत जिथे आवड, उद्देश आणि परफॉर्मन्स आम्हाला पुढे घेऊन जाईल’, असं स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आलं.
या स्पष्टीकरणाची पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत दीपिकाने तिची नाराजी व्यक्त केली. ‘..आणि त्यांनी हे आणखी वाईट केलंय’, असं तिने लिहिलंय. पत्रकार फाये डिसूझा यांनी कंपनीची पोस्ट त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली होती. त्याच्या कमेंट बॉक्समध्ये नेटकऱ्यांनीही एल अँड टी कंपनीवर टीका केली आहे. ‘वाह, त्यांनी अध्यक्षांच्या वक्तव्याचं समर्थनच केलंय. टॉक्सिक वर्क कल्चरला ते प्रोत्साहन देत आहेत’, असं एकाने लिहिलं. तर ‘अध्यक्षांना स्वत:चं आयुष्य नाही याचा अर्थ असा नाही की कर्मचाऱ्यांनाही नाही’, अशी टीका नेटकऱ्यांनी केली.