मुंबई : 25 नोव्हेंबर 2023 | बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील बऱ्याच सेलिब्रिटींनी अभिनयविश्वात काम करतानाच विविध व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली. काहींनी ब्युटी प्रॉडक्ट्सचा ब्रँड निर्माण केला, तर काहींनी कपड्यांचे ब्रँड्स सुरू केले. अशाच पद्धतीने अभिनेत्री दीपिका पादुकोणने 2022 मध्ये ब्युटी प्रॉडक्ट्सचा ब्रँड लाँच केला. 82E असं तिच्या स्किनकेअर ब्रँडचं नाव असून गेल्या वर्षभरात या ब्रँडला चांगलं यश मिळालं. दर तिमाहीला या ब्रँडचे नवीन प्रॉडक्ट्स लाँच केले जात आहेत. मात्र दीपिकाच्या या ब्युटी ब्रँड प्रॉडक्ट्सच्या किंमती खूप जास्त असल्याची तक्रार अनेकांनी केली. त्यावर आता दीपिकाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
‘सीएनबीसी-टीव्ही 18’ला दिलेल्या मुलाखतीत दीपिका म्हणाली, “जर मी तुम्हाला एखादा प्रॉडक्ट 2500 रुपयांना विकत असेन तर तुम्ही त्याच्या गुणवत्तेविषयी अजिबात काळजी करू नका. कारण ते प्रॉडक्ट्स मी स्वत: दररोज वापरते. प्रामाणिकपणा जपत आणि प्रयत्नांमध्ये सातत्य टिकवून आम्ही आमचा ब्रँड मोठा केला आहे. गेल्या वर्षभरात त्यामुळेच आमच्या ब्रँडला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि पुढेसुद्धा आम्ही हे प्रयत्न करत राहू.” दीपिकाच्या या ब्रँड अंतर्गत एखादा प्रॉडक्ट लाँच करण्यात येत असेल, तर सर्वांत आधी ती स्वत: ते वापरून पाहते.
याविषयी ती पुढे म्हणाली, “मीच गिनी पिग आहे. या संपूर्ण प्रणालीमध्ये प्रॉडक्ट्स सर्वांत आधी वापरून पाहणारी पहिली व्यक्ती मीच असते. त्यानंतरच ते क्लिनिकल ट्रायल्स आणि डर्मटोलॉजिकल ट्रायल्सना पाठवले जातात. सर्वांत आधी मी त्यांचा वापर करते. कमीत कमी एक आठवडा किंवा कधी महिनाभर तो प्रॉडक्ट वापरून त्याच्या परिणामांचं निरीक्षण करते. माझ्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच ते प्रॉडक्ट क्लिनिकल ट्रायल्सना पाठवलं जातं.”
ब्युटी प्रॉडक्ट्स इतकं महाग विकण्यावरून अनेकांनी दीपिकावर टीका केली होती. या टीकेवर प्रतिक्रिया देताना दीपिकाने सांगितलं, “सेलिब्रिटी ब्रँड्स असो किंवा सेलिब्रिटी.. ट्रोल होणं हा आमच्या आयुष्याचाच एक भाग झालाय. जोपर्यंत तुम्ही मान खाली घालून तुमचे प्रयत्न करत राहता, तुम्ही जे काम करताय त्याच्याशी प्रामाणिक राहता, तेव्हाच तुम्ही लाटेच्या पुढे जाऊ शकता.”
दीपिकाच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास, ती सध्या ‘फायटर’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता हृतिक रोशन मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याआधी ती शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटात झळकली होती. या भूमिकेसाठी तिने काहीच मानधन घेतलं नव्हतं.