गणेशोत्सव काळात अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या काळात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. आज 8 सप्टेंबर रोजी दीपिकाने मुलीला जन्म देत चाहत्यांना ‘गोड बातमी’ दिली आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. सप्टेंबर महिन्यात बाळाचा जन्म होणार असंही तिने म्हटलं होतं. अखेर गणेशोत्सव काळात दीपिका आणि रणवीर सिंहच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. लग्नाच्या सहा वर्षांनंतर हे दोघं आई-बाबा बनले आहेत. रणवीर आणि दीपिकाने 2018 मध्ये इटलीत लग्न केलं होतं. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हे दोघं लग्नबंधनात अडकले होते.
रणवीरने त्याच्या एका जुन्या मुलाखतीत खास इच्छा बोलून दाखवली होती. रणवीरला मुलगी हवी होती आणि अखेर त्याची ही इच्छा पूर्ण झाली आहे. शनिवारी दीपिकाला मुंबईतील एचएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यापूर्वी शुक्रवारी रणवीर आणि दीपिका हे मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले होते. आता दीपिकाच्या डिलिव्हरीची बातमी समोर येताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दीपिका आणि रणवीरची पहिली भेट एका पुरस्कार सोहळ्यात झाली होती. दीपिकाला पाहताचक्षणी रणवीर तिच्या प्रेमात पडला होता. मात्र ‘रामलीला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये एकमेकांविषयी प्रेमाची भावना निर्माण झाली. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दीपिका-रणवीरला एकत्र आणण्यात मोठी भूमिका बजावली, असं म्हटलं जातं. या दोघांनी रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. भूतकाळातील काही अनुभव पाहता दीपिका सुरुवातील लग्नाबाबत संभ्रमात होती. मात्र अखेर दोघांनी 2015 मध्ये गुपचूप साखरपुडा केला होता. याविषयीचा खुलासा रणवीरने ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये केला होता. जवळपास तीन वर्षांपर्यंत त्यांनी साखरपुड्याबाबत कमालीची गुप्तता पाळली होती.
बाळाच्या जन्मानंतर दीपिका आणि रणवीर नव्या घरात राहायला जाणार असल्याचं कळतंय. दीपिका-रणवीर हे त्यांच्या नव्या आलिशान घरात शिफ्ट होणार आहेत. हे घर अभिनेता शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या बंगल्याच्या शेजारीच आहे.