अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे. रणवीर सिंग आणि दीपिकाच्या घरात लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं किंवा पाहुणीचं आगमन होणार आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांनी ही गोड बातमी चाहत्यांना सांगितली होती. त्यानंतर आता गरोदरपणात दीपिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवरील मजकूर वाचून चाहते पेचात पडले आहेत. दीपिकाला नेमकं काय म्हणायचं आहे किंवा ती तणावात आहे का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. दीपिकाने यश आणि यशाची संकल्पना याविषयीची ही पोस्ट शेअर केली आहे.
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये दीपिकाने ही पोस्ट शेअर केली आहे. ‘आपण कुठे आहोत हे जाणून घेण्यासाठी आजूबाजूला पाहा. यशाची संकल्पना बदलण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते पहा. जेणेकरून तुमच्यानंतर येणाऱ्या महिलांना यश किंवा सततचा दबाव, तणाव यापैकी एक गोष्ट निवडायची गरज भासणार नाही’, अशा आशयाची ही पोस्ट आहे. दीपिकाच्या या पोस्टमध्ये ‘Burnout’ असा शब्द वापरण्यात आला आहे. त्याचा अर्थ म्हणजे एक अशी स्थिती जी दीर्घकाळाच्या तणावामुळे भावनात्मक, शारीरिक आणि मानसिक थकव्यात रुपांतरित होते. जेव्हा एखादी व्यक्ती भावनिकदृष्ट्या खचून जाते आणि सततच्या मागण्या पूर्ण करू शकत नाही, तेव्ही ती अशा स्थितीला सामोरी जाते. त्यामुळे दीपिकाने अशी पोस्ट का शेअर केली असावी, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
दीपिकाने फेब्रुवारी महिन्यात गरोदर असल्याची घोषणा केली होती. ही गोड बातमी सांगताना तिने ‘सप्टेंबर 2024’ असं लिहिलं होतं. म्हणजेच सप्टेंबर महिन्यात दीपिकाच्या बाळाचा जन्म होणार आहे. यानंतर चाहत्यांनी रणवीर आणि दीपिकावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. लग्नाच्या पाच वर्षानंतर हे दोघं आई-बाबा होणार आहेत.
दीपिकाच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ती नुकतीच हृतिक रोशनसोबत ‘फायटर’ या चित्रपटात झळकली होती. याशिवाय ती लवकरच ‘कल्की 2989 एडी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती प्रभाससोबत भूमिका साकारणार आहे. चित्रपटात दीपिका आणि प्रभाससोबत अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे.