अभिनेत्री दीपिका पादुकोण आई झाल्यानंतर बेंगळुरूमध्ये पहिल्यांदाच चाहत्यांसमोर आली होती. पंजाबी गायक दिलजित दोसांझच्या बेंगळुरूतील कॉन्सर्टला तिने खास हजेरी लावली होती. दिवाळीच्या मुहूर्तावर दीपिकाने मुलीला जन्म दिला होता. रणवीर सिंह आणि दीपिकाने त्यांच्या मुलीचं नाव ‘दुआ’ असं ठेवलंय. मुलीच्या जन्मानंतर दीपिका सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे, मात्र कॉन्सर्टच्या निमित्ताने ती चाहत्यांसमोर पहिल्यांदाच आली. या कॉन्सर्टनंतर दीपिका मुंबईत परतली आहे. यावेळी मुंबई एअरपोर्टवर तिला बाळासोबत पाहिलं गेलं. पापाराझींनी दीपिकाचे बाळासोबत फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले असून सध्या सोशल मीडियावर ते तुफान व्हायरल होत आहेत.
दीपिकाने 8 सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला. त्यानंतर रुग्णालयातून डिस्जार्ज मिळाल्यानंतर बाळासोबतचा तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता मुंबई एअरपोर्टवर दीपिका कॅरियरच्या मदतीने बाळाला उचलून घेतल्याचं दिसून आलं. यावेळी दिपिकाने तिच्या मुलीचा चेहरा कॅमेऱ्यामध्ये कैद होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतली होती. दीपिकाच्या लेकीचा चेहरा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.
याआधी बऱ्याच सेलिब्रिटींनी त्यांच्या बाळाचा चेहरा माध्यमांसमोर किंवा फोटोग्राफर्ससमोर आणला नव्हता. अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनेही त्यांची मुलगी राहाचा चेहरा सुरुवातीला पापाराझींना दाखवला नव्हता. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी अजूनसुद्धा त्यांच्या मुलीचा आणि मुलाचा चेहरा सोशल मीडियावर दाखवला नाही. त्यांनी फोटोग्राफर्सनाही त्यांचे फोटो क्लिक न करण्याची विनंती केली आहे.
फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने चाहत्यांना प्रेग्नंसीची ‘गुड न्यूज’ दिली होती. सप्टेंबर महिन्यात बाळाचा जन्म होणार असल्याचं तिने म्हटलं होतं. तेव्हापासून दीपिकाचा बेबी बंप पाहण्यासाठी नेटकरी आतूर झाले होते. लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान होत असताना दीपिका आणि रणवीर सिंह हे आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले होते. त्यावेळी पहिल्यांदाच दीपिकाचा बेबी बंप पहायला मिळाला होता. मात्र त्यानंतरही काहींनी दीपिकाला ट्रोल केलं होतं. मे महिन्यात जेव्हा दीपिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, तेव्हासुद्धा तिचा बेबी बंप न दिसल्याने नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. मे महिना उजाडला तरी दीपिकाचं पोट अजून कसं दिसत नाही, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता.