अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. गणेशोत्सवात 8 सप्टेंबर रोजी दीपिकाने मुलीला जन्म दिला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात तिने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. डिलिव्हरीच्या दोन दिवस आधी तिने मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ती रुग्णालयात दाखल झाली होती. दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्जही मिळाला आहे. मात्र त्यापूर्वी तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक गोष्ट अपडेट केली आहे. ते म्हणजे दीपिकाने तिच्या इन्स्टा बायोमध्ये एक मजकूर लिहिला आहे. या मजकूराने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. आई बनल्यानंतर दीपिकाचं आयुष्य कसं सुरू आहे, हे मजकूर वाचल्यानंतर लक्षात येतं.
दीपिकाने लिहिलंय ‘फीड, बर्प, स्लीप, रीपिट’ म्हणजेच बाळाला स्तनपान करा, बाळाला ढेकर काढू द्या, त्यानंतर त्याला झोपवा आणि पुन्हा हेच करा. आई झाल्यानंतर सध्या दीपिकाचं आयुष्य तिच्या बाळाने व्यापलं आहे. त्यामुळे सध्या तिच्या बाळाचं जे रुटीन आहे, तेच तिने या बायोमध्ये लिहिलं आहे.
रविवारी 9 सप्टेंबर रोजी दीपिकाने चाहत्यांना ‘गोड बातमी’ सांगितली. सोमवारी रणवीरची बहीण रितिका भवनानी तिच्या भाचीला पाहण्यासाठी रुग्णालयात जाताना दिसली होती. त्यानंतर रणवीर-दीपिकाच्या मुलीला भेटण्यासाठी देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणजेच उद्योगपती मुकेश अंबानी पोहोचले होते. दीपिकाचा सहकलाकार शाहरुख खानसुद्धा रुग्णालयात तिला भेटायला गेला होता.
बाळाच्या जन्मानंतर दीपिका आणि रणवीर नव्या घरात राहायला जाणार असल्याचं कळतंय. दीपिका-रणवीर हे त्यांच्या नव्या आलिशान घरात शिफ्ट होणार आहेत. हे घर अभिनेता शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या बंगल्याच्या शेजारीच आहे. दीपिका-रणवीरने 2015 मध्ये गुपचूप साखरपुडा उरकला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी इटलीत लग्न केलं.
दीपिकाला मुलगी होताच रणवीरची मोठी इच्छा पूर्ण झाली. रणवीरने त्याच्या एका जुन्या मुलाखतीत ही खास इच्छा बोलून दाखवली होती. रणवीरला मुलगी हवी होती आणि अखेर त्याची ही इच्छा पूर्ण झाली आहे. मुलीच्या जन्मानंतर रणवीर आणि दीपिकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली. ‘बेबी गर्लचं स्वागत’ असं लिहित त्यांनी त्याखाली जन्मतारखेचा उल्लेख केला होता. या पोस्टवर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. बाळाच्या जन्मानंतर दीपिका मार्च 2025 पर्यंत कामातून ब्रेक घेणार असल्याचं कळतंय. त्यानंतर ती ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाच्या सीक्वेलच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.