नवी दिल्ली : 19 जानेवारी 2024 | संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली असली तरी ओटीटीवर प्रदर्शित करण्यासाठी त्यासमोर अनेक अडचणी येत आहेत. आता दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजवर स्थगिती आणण्यासाठी समन्स बजावले आहेत. या चित्रपटाचे सहनिर्माते सिने वन स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेडने ‘ॲनिमल’च्या ओटीटी रिलीजवर स्थगिती आणण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने नेटफ्लिक्स आणि निर्मात्यांना समन्स बजावले आहेत. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी यांच्या भूमिका असलेला ‘ॲनिमल’ हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित झाला होता. येत्या 26 जानेवारी रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार होता.
जोपर्यंत तिन्ही प्रतिवादींनी सादर केलेल्या कागदपत्रांचा स्वीकार किंवा नाकारण्याचे शपथपत्र दाखल होत नाही, तोपर्यंत लेखी विधान रेकॉर्डवर ग्राह्य धरले जाणार नाहीत, असं न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी स्पष्ट केलं. सिने वन स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेडने म्हटलंय की दोन प्रॉडक्शन हाऊसदरम्यान चित्रपटाच्या बाबतीत एक करार झाला होता. या कराराअंतर्गत 35 टक्के नफ्यातील भाग आणि 35 टक्के इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्समधील भाग त्यांना मिळणार होता. टी-सीरिजसोबत मिळून स्वाक्षरी केलेल्या 2019 च्या अधिग्रहण करारातील विविध कलमांचं उल्लंघन केल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासोबतच ‘ॲनिमल’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करू नये, अशी मागणीही त्यांनी केली होती.
Delhi HC issues summons to Netflix and co-producer of film ‘Animal’ on plea to restrain OTT release
— Press Trust of India (@PTI_News) January 19, 2024
सिने वनचा खटला लढणारे वकील संदीप सेठी याविषयी म्हणाले होते, “‘टी-सीरिजकडून सगळा पैसा घेतला जात आहे, पण त्यांनी सिने वनला एकही पैसा दिला नाही. सहनिर्मात्यांचे त्यांच्यासोबत दीर्घकाळापासून संबंध आहेत, पण त्यांच्यासोबत झालेल्या कराराचा ते सन्मान करत नाहीत. संबंध आणि कराराच्या सन्मानापोटी सहनिर्मात्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. ” दुसरीकडे टी-सीरिजने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटात सिने वन स्टुडिओजने एकही पैसा गुंतवला नसल्याचं वकील अमित सिब्बल म्हणाले.