मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेते म्हणून ओळखले जाणारे देव आनंद यांचं पाकिस्तानशी फार जवळचं नातं होतं. जन्मापासून ते कॉलेजपर्यंतच्या शिक्षणापर्यंत सर्व काही त्यांचं पाकिस्तानमधील लाहोरमध्ये झालं होतं. मात्र 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर ते भारतात आले आणि मुंबईत राहून अभिनयक्षेत्रातील करिअरची सुरुवात केली. मात्र त्यांचं वडिलोपार्जित घर लाहोरमध्येच होतं. 55 वर्षांनंतर देव आनंद पुन्हा एका पाकिस्तानात गेले होते. त्यावेळी त्यांनी त्या सर्व ठिकाणांना भेट दिली, जिथे त्यांच्या असंख्य आठवणी होत्या. जुन्या आठवणींना उजाळा देत ते खूप भावूक झाले होते. काही ठिकाणांना भेट देऊन ते अक्षरश: ढसाढसा रडू लागले होते.
1999 मध्ये देव आनंद लाहोरला गेले होते. त्यावेळी ते अत्यंत भावूक झाले होते. देव आनंद यांनी त्यांच्या ‘रोमॅन्सिंग विद लाइफ’ या पुस्तकात लिहिलं होतं की जेव्हा ते वाघाहून पाकिस्तानला पोहोचले, तेव्हा तिथे बरंच काही बदललेलं पहायला मिळालं. मात्र मॉल रोडवरील तोफ पाहून त्यांना जुने दिवस आठवले आणि त्यानंतर आपलं कॉलेज दिसणार हे त्यांना समजलं होतं. देव आनंद जेव्हा त्यांच्या कॉलेजजवळ पोहोचले, तेव्हा ते खूप भावूक झाले होते.
कॉलेजच्या कॅम्पसची बिल्डिंग आणि क्लासरूम पाहताच त्यांच्या मनात असंख्य आठवणी दाटून आल्या होत्या. कॉलेजमधील एका कॉरिडोरच्या खांबाला मिठी मारून ते ढसाढसा रडू लागले होते. कारण त्या खांबाजवळ त्यांच्या कॉलेजच्या बऱ्याच आठवणी होत्या. कॉलेजमध्ये शिकताना ते त्याच ठिकाणी मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी जमायचे. कधी एकटं वाटल्यास ते त्या खांबाजवळ येऊन उभे राहायचे. त्याच खांबाला पाहून देव आनंद यांना त्यांचं पहिलं प्रेमसुद्धा आठवलं होतं.
देव आनंद यांचा जन्म 26 सप्टेंबर 1923 रोजी पाकिस्तानमध्ये झाला होता. त्यांचं संपूर्ण शिक्षण तिथेच पूर्ण झालं होतं. गवर्नमेंट कॉलेज लाहोरमधून पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर ते 1943 मध्ये मुंबईला आले. इंग्रजी लिटरेचरमधून त्यांना मास्टर्स करायचं होतं. पण त्यांच्या वडिलांकडे शिक्षणासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे नोकरीसाठी त्यांनी मुंबई गाठली होती. मात्र इथे आल्यानंतर ते अभिनयात रमले. बॉलिवूडमध्ये त्यांनी एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत.