मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खान तुफान चर्चेत आहे. कुख्यात डॉन लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमान खानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असतात. सलमान खान याला असलेला धोका लक्षात घेत अभिनेत्याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलमान खान याच्या सुरक्षेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘सलमान खान याला देण्यात आलेली सुरक्षा सर्वोच्च दर्जाची आहे. त्याला मुंबईत किंवा भारतात कुठेही फिरायला हरकत नाही. मला वाटतं मुंबईपेक्षा कुठलीही जागा सुरक्षित नाही…’ सध्या देवेंद्र फडणवीस यांनी सलमान खान याच्या सुरक्षेबद्दल केलेलं वक्तव्य तुफान चर्चेत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत हे वक्तव्य केलं आहे. वास्तविक सलमान खानवर काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. बिश्नोई समाजात काळवीटाला अत्यंत पवित्र मानलं जातं. यामुळे सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. मिळत असलेल्या धमक्यांवर अभिनेता म्हणाला, ‘जे व्हायचं ते होणार आहे… मिळालेल्या सूचनांचं पालन करत आहे…’
अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर भाईजानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या सुरक्षेसाठी त्याचे बॉडीगार्ड आणि मुंबई पोलीस देखील सतर्क आहेत. अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून अभिनेत्याला व्हाय प्लस सुरक्षा प्रदाण करण्यात आली आहे. याशिवाय खुद्द भाईजानने स्वतःसाठी बुलेटप्रुफ गाडी खरेदी केली आहे.
सलमान खान याच्या सुरक्षेबद्दल कंगना रनौत हिचं वक्तव्य
सलमान खान याच्या सुरक्षेबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘ज्यांची सुरक्षा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हातात आहे, त्यांना काळजी करण्याचं काही कारण नाही. त्यांना केंद्र सरकारकडून सुरक्षा मिळाली आहे, त्यामुळे मला खात्री आहे. मला देखील धमकी मिळाली होती, तेव्हा माझ्या सुरक्षेची देखील काळजी घेण्यात आली होती.’
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘मी म्हणाली होती की, देश चांगल्या हातात असतात आपण काळजी का करावी? आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही…’ सध्या सलमान खान याच्याबद्दल अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य सर्वत्र चर्चेत आहे.
भाईजान स्वतःच्या सुरक्षेबद्दल म्हणाला, ‘असुरक्षिततेपेक्षा सुरक्षितता चांगली आहे…. सुरक्षा आहे… आता रस्त्यावर सायकल चालवणं आणि एकट्याने कुठेही जाणं शक्य नाही. जेव्हा ट्रॅफिकमध्ये असतो तेव्हा मला अधिक त्रास होतो. माझ्या सुरक्षेमुळे इतर लोकांची गैरसोय होते. ते सर्व मलाही लुक देतात. माझे चाहते… पण मोठा धोका आहे म्हणून सुरक्षा आहे…चारही बाजूला इतके शेरा आणि इतक्या बंदुका पाहून मी घाबरतो.’