प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन्ही पत्नींसोबत ‘बिग बॉस ओटीटी 3’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला. कृतिका आणि पायल या अरमानच्या दोन पत्नी असून दोघी एकमेकांच्या मैत्रिणी आहेत. बिग बॉसच्या घरात पायलने त्यांच्या लग्नाची गोष्ट सांगितली. एका मित्राच्या माध्यमातून तिची भेट अरमानशी झाली. सहा दिवसांच्या अफेअरनंतर सातव्या दिवशी तिने तिचं घर सोडून अरमानशी लग्न केलं. नंतर पायलचीच मैत्रीण कृतिकाशी अरमानची भेट झाली. अरमानने तिच्याशी दुसरं लग्न केलं. लग्नानंतर हे तिघं आणि त्यांची मुलं एकत्र एकाच घरात राहतात. या सर्व गोष्टींबद्दल प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. देवोलीनाने बिग बॉसवर ‘पॉलिगॅमी’ला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे.
देवोलीनाने अरमान आणि त्याच्या दोन्ही पत्नींबद्दलची बातमी शेअर करत त्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘तुम्हाला हे मनोरंजन वाटतंय का? हे अजिबात करमणूक नाही, घाण आहे. ही गोष्ट हलक्यात घेण्याची चूक करू नका, कारण हे रिल नाही, रिअल आहे. या निर्लज्जपणाला करमणूक कसं म्हणता येईल, हेच मला समजत नाही. मला हे ऐकूनच तिरस्कार वाटतोय. म्हणजे, अवघ्या सहा ते सात दिवसांत प्रेम झालं, लग्न झालं आणि मग बायकोच्या मैत्रिणीशी तेच केलं. हे सर्व माझ्या कल्पनेपलीकडचं आहे,’ असं तिने लिहिलंय.
‘बिग बॉस, तुम्हाला काय झालंय? तुमचे इतके वाईट दिवस सुरू आहेत का, की तुम्हाला पॉलिगॅमी (एकापेक्षा अधिक पत्नी) मनोरंजक वाटतंय? अशा स्पर्धकांची ओळख करून देताना तुम्ही काय विचार करत होता? हा शो लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण पाहतात. तुम्हाला नवीन पिढीला नेमकं काय शिकवायचं आहे? त्यांनीसुद्धा दोन-तीन-चार लग्न करावीत का? प्रत्येकजण एकत्र सुखाने राहू शकेल का? जे लोक दररोज अशा घटनांचा सामना करतात, दु:खात आयुष्य जगतात.. त्यांना विचारा,’ अशा शब्दांत तिने राग व्यक्त केला.
‘म्हणूनच विशेष विवाह कायदा आणि UCC (युनिफॉर्म सिव्हिल कोड) अनिवार्य असावं. जेणेकरून कायदा सर्वांसाठी समान असेल आणि समाज अशा गलिच्छांपासून मुक्त होऊ शकले. पहिली पत्नी असताना दुसरी पत्नी.. कल्पना करा जर समानतेच्या नावाखाली बायकांनी दोन-दोन नवरे केले तर, तेव्हाही तुम्हाला ते मनोरंजक वाटेल का,’ असा सवाल देवोलीनाने विचारला आहे.
Do you think this is entertainment? This is not entertainment, it’s filth. Don’t make the mistake of taking this lightly because it’s not just a reel, it’s real. I mean, I can’t even understand how anyone can call this shamelessness entertainment ? I feel disgusted just hearing… https://t.co/BVeVjGrTm2
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) June 22, 2024
‘यांचे फॉलोअर्स कोण आहेत, हेच मला समजत नाही. कोणत्या कारणासाठी ते त्यांना फॉलो करतात? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? नसेल तर आधी उपचार घ्या. जर तुम्हाला हा निर्लज्जपणा योग्य वाटत असेल तर तुमचं आयुष्य व्यर्थ आहे. तुम्ही याच्या पलीकडे काही विचार करू शकत नाही आणि त्याबद्दल तुम्ही काही करू शकत नाही. तुम्हाला नवीन पिढीला काय शिकवायचं आहे? त्यांनीसुद्धा एकापेक्षा जास्त लग्न करावेत का? हा विचारच घाणेरडा आहे. जर दोन-तीन लग्न करणं इतकं गरजेचंच असेल तर करा आणि घरातच राहा. ही घाणेरडी मानसिकता जगात पसरवू नका. समाज म्हणून आपण केवळ विनाशाकडे जातोय. खरंच लोक वेडे झाले आहेत आणि बिग बॉस.. मला समजत नाहीये की तुम्हाला काय झालंय,’ असंही तिने विचारलंय.
युट्यूबर अरमान मलिकचं आयुष्य हे जणू खुल्या किताबाप्रमाणे आहे. त्याच्या खासगी आयुष्यात जे-जे घडतं ते सर्व तो सोशल मीडियावर अपलोड करत असतो. दोन मुलींसोबत लग्न केल्यामुळे तो प्रकाशझोतात आला होता. पायल आणि कृतिका अशा त्याच्या दोन्ही पत्नींची नावं आहेत. तर चार मुलांचा तो पिता आहे.