विभक्त होणार असल्याचं जाहीर केल्यानंतर दोन वर्षांनी साऊथ सुपरस्टार धनुष आणि दिग्दर्शिका ऐश्वर्या रजनीकांत यांनी अखेर अधिकृतरित्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली आहे. दोघांना परस्पर संमतीने घटस्फोट हवा असून मुलांची कस्टडी ही प्रामुख्याने ऐश्वर्याला मिळू शकते, असं समजतंय. धनुष आणि ऐश्वर्याने चेन्नईमध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. दोन वर्षांपूर्वी या दोघांनी सोशल मीडियाद्वारे घटस्फोट जाहीर केला होता. त्यानंतर कुटुंबीयांकडून त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला गेला. तेव्हापासून धनुष आणि ऐश्वर्या वेगवेगळेच राहत आहेत.
धनुष आणि ऐश्वर्याजवळच्या सूत्रांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “त्यांनी चेन्नईमध्ये अधिकृतरित्या घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. दोघं वेगवेगळेच राहत असून घटस्फोटाच्या कटुतेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघांनी त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोघांनी घटस्फोट घेण्याचं ठरवलं आहे.”
दोघांनी परस्प संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून याबाबत कोर्टात कोणताच वाद उपस्थित होणार नसल्याचंही सूत्रांनी स्पष्ट केलं. “घटस्फोटासाठी कोर्टात भांडण किंवा एकमेकांवर आरोप होणार नाहीत. आयुष्यात घडून गेलेल्या काही गोष्टींना दोघांनीही आपापल्या परीने समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे यापुढे दोघं सोबत राहू शकत नाहीत, हेसुद्धा त्यांनी मान्य केलंय. त्यामुळे घटस्फोटाची प्रक्रिया एकमेकांच्या संमतीनेच पार पडत आहे”, असं त्यांनी पुढे सांगितलंय.
धनुष आणि ऐश्वर्याने 2004 मध्ये लग्न केलं असून या दोघांना यात्रा आणि लिंगा ही दोन मुलं आहेत. मुलांच्या कस्टडीबद्दल सूत्रांनी पुढे सांगितलं, “सध्या दोघं मिळून मुलांचा सांभाळ करत आहेत. मात्र मुलांचा प्राथमिक ताबा ऐश्वर्यालाच मिळू शकतो. धनुष त्यासाठी वाद घालणार नाही. पण मुलांना कोणतीही गरज भासल्यास तो त्यांच्यासोबत कायम असेल. सध्या दोघं मिळून त्यांच्या मुलांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. घटस्फोटाची प्रक्रिया सुरळीत व्हावी म्हणून मुलांना विश्वासात घेणं खूप महत्त्वाचं आहे.”
जानेवारी 2022 मध्ये धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट जाहीर केला होता. ऐश्वर्या ही साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. ‘मित्र, जोडीदार, पालक आणि एकमेकांचे शुभचिंतक म्हणून 18 वर्षे सोबत राहिल्यानंतर आता आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेत आहोत. हा संपूर्ण प्रवास एकमेकांना समजून घेण्याचा, सोबत पुढे जाण्याचा होता. मात्र यापुढील प्रवास हा आम्हाला वेगवेगळा करावा लागणार आहे’, असं त्यांनी लिहिलं होतं.