‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा’ अशी थेट आणि स्पष्ट गर्जना करणारे धर्मवीर आनंद दिघे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर ‘धर्मवीर 2’ या चित्रपटात उलगडणार आहेत. या चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. येत्या 27 सप्टेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून त्याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या यापूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझर, ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाची गाणीही गाजत आहेत. त्यानंतर आता आणखी एक नवा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे.
‘धर्मवीर 2’ या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे उमेश कुमार बन्सल आणि मंगेश देसाई यांनी केली आहे. तर लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांच्या खांद्यावर आहे. अभिनेता प्रसाद ओक, क्षितीश दाते यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या नव्या ट्रेलरमधून दिघेसाहेबांची विविध रुपं दाखवण्यात आली आहेत. सर्वसामान्यांसाठी झटणारे, अन्याय रोखणारे, महिलांना न्याय मिळवून देणारे, धर्मासाठी लढणारे दिघेसाहेब यात दिसतात. हिंदुत्त्वाविषयी थेट आणि आक्रमक भूमिका घेणारे साहेब यात दिसतात. म्हणूनच आता चित्रपटात काय कथानक उलगडणार याचं कुतूहल निर्माण झालं आहे.
आनंद दिघे यांना मानणारा एक मोठा वर्ग आजही मोठ्या प्रमाणात ठाण्यात आहे. आपल्या लोककारणी नेत्याला ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर बघायला प्रेक्षक आतुर होते. ‘धर्मवीर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट बघून अनेकजण भावूकही झाले आणि त्यांच्या आठवणी पुन्हा एकदा नव्याने जाग्या झाल्या होत्या. अभिनेता प्रसाद ओक याने साकारलेली धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका अतिशय उत्कृष्ट होती, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या होत्या.