आपलं आयुष्य सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची करणारे लोकनेते आनंद दिघे (Anand Dighe) यांचा जीवनप्रवास आता चित्रपटाच्या रुपात मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘धर्मवीर- मुक्काम पोष्ट ठाणे’ (Dharmaveer) असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा दमदार टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच आनंद दिघेंची भूमिका कोणता कलाकार साकारणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. अखेर यावरून पडदा उचलण्यात आला आहे. अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) हा आनंद दिघेंच्या भूमिकेत या टीझरमध्ये पहायला मिळतोय. तर प्रवीण तरडेंनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय जवळपास दीड मिनिटाच्या या टीझरमध्ये दमदार डायलॉग्समागे प्रवीण तरडेंचा व्हॉईस ओव्हर ऐकायला मिळतोय.
“कुठल्याही बँकेच साधं अकाऊंट नसलेला आणि दोन्ही खिसे रिकामे असलेला, जगातला सर्वांत श्रीमंत राजकारणी या महाराष्ट्राने पाहिलाय,” अशा संवादाने टीझरमध्ये आनंद दिघेंच्या व्यक्तीरेखेची ओळख करून दिली जाते. ठाण्याचा वाघ म्हणून ख्याती असलेल्या धर्मवील आनंद दिघेंच्या आयुष्यावरील हा चित्रपट येत्या 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
“तळागाळातील लोकांचा विचार करणं हे आनंद दिघेंचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. गरीबांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे आणि जुलूमाची भाषा करणाऱ्यांवर जरब बसवणारं हे व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून माणसं जोडली. या चित्रपटाच्या निमित्ताने मला त्यांचा हा जीवनप्रवास जगता आला. त्यांच्या भूमिकेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे”, असं प्रसादने सांगितलं.
हेही वाचा:
Prasad Oak: “..असं असेल तर मग मी हिंदीत का काम करावं?”; प्रसाद ओकची रोखठोक भूमिका
“बॉलिवूड चित्रपट दक्षिणेत का चालत नाही?”; सलमानच्या प्रश्नाचं रामचरणने दिलं उत्तर