बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी गुरुवारी लग्नाचा 44 वा वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी पुन्हा लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर सेलिब्रेशनचे काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा धर्मेंद्र यांच्याशी लग्न केल्याची चर्चा रंगली आहे. यातील एका फोटोमध्ये दोघांच्या गळ्यात फुलांची मोठी माळ पहायला मिळतेय. यावेळी हेमा मालिनी यांनी साडी नेसली होती. तर धर्मेंद्र यांनी त्याच रंगसंगतीचा शर्ट घातला होता. दुसऱ्या एका फोटोमध्ये धर्मेंद्र हे हेमा यांच्या गालावर किस करताना दिसत आहेत.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला मुलगी ईशा देओलसुद्धा उपस्थित होती. ‘आजचे घरातील काही फोटो’ असं कॅप्शन देत हेमा मालिनी यांनी हे फोटो पोस्ट केले आहेत. ईशानेही सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची पहिल्यांदा भेट 1970 मध्ये ‘तुम हसीन मैं जवान’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली. हेमा यांच्या घरातून लग्नाला विरोध असतानाही दोघंही आपल्या निर्णयावर ठाम होते. इतकंच नव्हे तर हेमा यांच्याशी लग्न करताना धर्मेंद्र हे विवाहित होते. प्रकाश कौर या धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी आहेत. 1980 मध्ये धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं.
Photos from today at home pic.twitter.com/JWev1pemnV
— Hema Malini (@dreamgirlhema) May 2, 2024
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या जोडीकडे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. हेमा मालिनी यांची आई जया चक्रवर्ती आणि वडील व्ही. एस. रामानुजन चक्रवर्ती यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतच्या लग्नाला स्पष्ट नकार दिला होता. कारण त्यावेळी धर्मेंद्र आधीच प्रकाश कौर यांच्याशी विवाहित होते. धर्मेंद्र यांच्यापासून हेमा मालिनी यांना दूर करण्यासाठी तिच्या वडिलांनी बरेच प्रयत्न केले होते.
“ते माझ्या आईसारखेच आहेत. ते माझ्यासमोर कधीच माझं कौतुक करत नाहीत. पण माझ्या मागे भरभरून कौतुकास्पद बोलतात. तू ठीक आहेस का, असं ते आईसारखंच मला विचारतात. कदाचित याच गोष्टींमुळे मी त्यांच्याकडे आकर्षित झाले होते”, असं हेमा मालिनी एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.