मुंबई | 1 ऑगस्ट 2023 : दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्याविषयी चाहत्यांना वेगळी ओळख देण्याची गरज नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. वयाच्या 87 व्या वर्षीसुद्धा ते इंडस्ट्रीत आणि सोशल मीडियावर सक्रिय आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती. धर्मेंद्र यांची मुलं सनी आणि बॉबी देओलसुद्धा इंडस्ट्रीत लोकप्रिय आहेत. तर देओल कुटुंबातील अभय देओलचाही मोठा चाहतावर्ग आहे. मात्र फार क्वचित लोकांना हे माहीत असेल की धर्मेंद्र यांचे भाऊ वीरेंद्र सिंह देओल हे त्यांच्या काळातील पंजाबी इंडस्ट्रीत सुपरस्टार होते. वीरेंद्र हे दिसायलासुद्धा धर्मेंद्र यांच्यासारखेच होते. मात्र 35 वर्षांपूर्वी त्यांची सेटवर भरदिवसा हत्या करण्यात आली होती. तेव्हा ते 40 वर्षांचे होते.
एकेकाळी धर्मेंद्र यांचे भाऊ वीरेंद्र हे पंजाबी इंडस्ट्रीतील सुपरस्टार होते. ते दिसायला धर्मेंद्र यांच्यासारखेच होते, म्हणून त्यांना पंजाबी इंडस्ट्रीतील धर्मेंद्र असंही म्हटलं जायचं. उत्तम अभिनेत्यासोबतच ते दिग्दर्शकही होते. त्यांनी 25 चित्रपट बनवले होते आणि ते सर्व सुपरहिट झाले होते. मात्र जसजसं त्यांना इंडस्ट्रीत यश मिळू लागलं, तसंतसं त्यांचे शत्रू वाढू लागले. अनेकांना त्यांच्या यशाबद्दल ईर्षा होती, असं म्हटलं जातं. अखेर 6 डिसेंबर 1988 रोजी अशी घटना घडली, ज्याची कोणी कल्पनासुद्धा केली नसेल. ‘जट ते जमीन’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वीरेंद्र यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
वीरेंद्र यांच्या मृत्यूनंतर पंजाबी फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली होती. आपल्या भावाला गमावल्यानंतर धर्मेंद्र पूर्णपणे खचले होते. आश्चर्याची बाब म्हणजे वीरेंद्र यांच्या हत्येचं गूढ अद्याप कायम आहे. कारण त्याकाळी पंजाबमध्ये गोळीबाराच्या घटना सातत्याने घडत होत्या. म्हणून वीरेंद्र यांच्यावर गोळ्या झाडणारा मारेकरी अद्याप सापडला नाही.
वीरेंद्र यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात 1975 मध्ये ‘तेरी मेरी इक जिंदडी’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात त्यांच्यासोबत धर्मेंद्र यांनीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. हा चित्रपट हिट होताच त्यांच्या करिअरची गाडी पुढे सरकू लागली. त्यानंतर त्यांनी ‘धरम जीत’, ‘कुंवारा मामा’, ‘जट शूरमे’, ‘रांझा मेरा यार’, ‘वैरी जट’ यांसारख्या 25 पंजाबी हिट चित्रपटांमध्ये काम केलं. अभिनेत्यासोबतच ते लेखक, दिग्दर्शक आणि निर्मातेसुद्धा होते.