मुंबई : 17 फेब्रुवारी 2024 | ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलच्या घटस्फोटाच्या वृत्ताने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. लग्नाच्या 11 वर्षांनंतर ईशाने पती भरत तख्तानीला घटस्फोट दिला. ईशा आणि भरतच्या विभक्त होण्याच्या वृत्ताने चाहत्यांना धक्का बसला असला तरी आतापर्यंत देओल कुटुंबीयांकडून यावर कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नव्हती. मात्र मुलीच्या घटस्फोटाच्या निर्णयावर वडील धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया काय होती, हे आता समोर आलं आहे. ईशाने तिच्या निर्णयाबाबत पुन्हा एकदा विचार करावा, असं त्यांचं मत होतं. ईशा आणि भरतच्या घटस्फोटामुळे त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.
‘बॉलिवूड लाइफ’ या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार देओल कुटुंबीयांच्या जवळच्या एका व्यक्तीने धर्मेंद्र यांच्या प्रतिक्रियेविषयीची माहिती दिली आहे. “कोणतेच आईवडील हे त्यांच्या मुलांचं कुटुंब विखुरताना पाहू शकत नाही. धर्मेंद्र हे ईशाचे वडील आहेत आणि त्यांचं दु:ख हे कोणीही सहज समजू शकतं. भरतपासून विभक्त होण्याच्या ईशाच्या निर्णयाच्या ते विरोधात नव्हते. मात्र तिने पुन्हा एकदा त्यावर विचार करावा, असं त्यांचं मत होतं”, असं जवळच्या व्यक्तीने सांगितलंय. ईशा आणि भरत हे दोघं धर्मेंद्र यांच्या जवळचे आहेत. धर्मेंद्र हे ईशाच्या घटस्फोटाच्या विरोधात नसले तरी आई-वडील विभक्त झाल्याने मुलांवर परिणाम होतो, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे मुलांसाठी का होईना एकदा पुनर्विचार करावा, असं धर्मेंद्र यांचं मत होतं.
“मुलीच्या घटस्फोटामुळे धर्मेंद्र खरंच खूपर दु:खी आहेत. म्हणूनच ते दोघांना पुन्हा एकदा विचार करायला सांगत होते. ईशा आणि भरत यांना दोन मुली आहेत. राध्या आणि मिराया या दोन्ही मुली त्यांच्या आजी-आजोबांच्या खूप जवळ आहेत. आईवडिलांच्या घटस्फोटाचा त्यांच्यावर परिणाम होईल आणि त्यामुळेच हे लग्न वाचवलं जाऊ शकतं होतं, असं धर्मेंद्र यांना वाटत होतं”, असंही ते पुढे म्हणाले.
ईशा आणि भरत यांचं नातं अचानक तुटलं नाही , तर गेल्या बऱ्याच काळापासून त्यांच्यात तणाव होताच. याच कारणामुळे हेमा मालिनी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या पार्टीला भरत कुठेच दिसला नव्हता. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जेव्हा ईशाने तिचा वाढदिवस साजरा केला, तेव्हासुद्धा भरत अनुपस्थित होता. कौटुंबिक कार्यक्रमांपासून तो दूरच राहू लागला होता. ईशा आणि भरतने आधीच आपले मार्ग वेगळे केले होते. म्हणूनच देओल कुटुंबाला त्याविषयी काही आश्चर्य वाटलं नाही, असं म्हटलं जातंय.