मुंबई : मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या बिग बजेट चित्रपटात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागातील तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांनी मनं जिंकली होती. नुकताच या चित्रपटाच्या सीक्वेलचा ट्रेलर लाँच करण्यात आला. मात्र या कार्यक्रमाला जेव्हा ऐश्वर्याची एण्ट्री झाली, तेव्हा तिला पाहून सर्वजण थक्क झाले. ऐश्वर्याचा बदललेला लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात ऐश्वर्याने गुलाबी आणि सोनेरी रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला होता. कार्यक्रमासाठी येताच तिने खुशबू, रेवती आणि सुहासिनी या अभिनेत्रींना मिठी मारली. तर दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ती पाया पडली. ऐश्वर्याचा मंचावर येऊन बोलतानाचाही एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तिचा लूक पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. तर वयानुसार दिसण्यात फरक जाणवणं हे स्वाभाविक असल्याचं तिच्या चाहत्यांनी म्हटलंय.
आज सलमान खान तुला पाहून सुटकेचा नि:श्वास सोडत असेल, अशा शब्दांत एका नेटकऱ्याने ट्रोल केलं. तर तिने चेहऱ्यावर खूपच बोटॉक्स केलं आहे, असं दुसऱ्याने म्हटलंय. ऐश्वर्याने तिच्या चेहऱ्यावर नेमकं काय केलंय, असाही सवाल काहींनी केला आहे. ऐश्वर्याने स्वत:च्याच सौंदर्याची वाट लावली, अशी टीका युजर्सनी केली आहे.
दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘पोन्नियिन सेल्वन’चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मल्टिस्टारर चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा नंदिनीची दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे. पोन्नियिन सेल्वन 1 मध्ये चोल सम्राट राजराजा 1 अरुलमोझिवर्मन (पोन्नियिन सेल्वन- (947-1014)) यांच्या सुरुवातीच्या जीवनाची कथा दाखवण्यात आली होती. या चित्रपटात जयम रवी हे अरुलमोझिवर्मनच्या भूमिकेत होते. तर विक्रम, कार्ती, त्रिशा आणि ऐश्वर्या यांनी इतर महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.
पीएस- 1 या चित्रपटाने जगभरात 500 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता. तमिळनाडूमध्ये हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. कमल हासन यांच्या ‘विक्रम’ या चित्रपटाचा रेकॉर्ड पीएस-1 ने मोडला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने ऐश्वर्या रायने जवळपास दशकभरानंतर तमिळ सिनेसृष्टीत पुनरागमन केलं. यामध्ये तिने नंदिनी आणि तिची मूक आई मंदाकिनी देवी अशा दुहेरी भूमिका साकारल्या होत्या.