बॉलिवूडची ड्रीम गर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला नुकतीच 44 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त दोघांनी एकत्र लग्नाचा वाढदिवस साजरा केला. हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट करताच पुन्हा एकदा धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीची चर्चा होऊ लागली आहे. धर्मेंद्र जेव्हा हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले, तेव्हा ते विवाहित होते. प्रकाश कौर यांच्याशी त्यांचं लग्न झालं होतं. या दोघांनी सनी, बॉबी, अजिता आणि विजीता ही चार मुलं होती. धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. मात्र या लग्नासाठी त्यांनी पहिल्या पत्नीसोबत एक डील केल्याचं म्हटलं जातं. हेमा यांच्याशी दुसऱ्या लग्नाची परवानगी देण्यापूर्वी प्रकाश कौर यांनी धर्मेंद्र यांच्यासमोर एक अट ठेवली होती, अशी त्यावेळी चर्चा होती.
पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न करता येणार नसल्याने त्याकाळी धर्मेंद्र यांनी धर्म बदलून हेमा यांच्याशी लग्न केलं. 1980 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. या लग्नानंतर अशा चर्चांना उधाण आलं होतं की हेमाशी लग्न करण्यासाठी परवानगी देण्यापूर्वी प्रकाश कौर यांनी एक अट ठेवली होती. “जर तुम्हाला हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न करायचं असेल तर मुलगा सनी देओलला बॉलिवूडमध्ये लाँच करावं लागेल”, अशी अट त्यांनी ठेवल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यानंतर 1983 मध्ये सनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नंतर ‘स्टारडस्ट मॅगझिन’ला दिलेल्या एका मुलाखतीत प्रकाश कौर यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती.
“ज्या अटीची एवढी चर्चा होतेय, ते साफ खोटं आहे. यात काहीच तथ्य नाही. सनी हा फक्त माझाच नाही तर धर्मेंद्र यांचाही मुलगा आहे. तेसुद्धा त्यांच्या मुलावर तितकंच प्रेम करतात, जितकं मी करते”, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याच मुलाखतीत प्रकाश कौर यांनी हेमा मालिनी यांच्याविषयीही मत मांडलं होतं. “तिचा धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय चुकीचा होता. मी तिच्या जागी असती तर कधीच कोणाचं घर मोडलं नसतं”, असं त्या म्हणाल्या होत्या. इतकंच नव्हे तर प्रकाश कौर यांनी धर्मेंद्र यांचा बचावही केला होता. हेमा यांच्याशी दुसरं लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांच्यावर बरीच टीका झाली होती. त्यावर प्रकाश कौर म्हणाल्या होत्या की, “धर्मेंद्र यांच्याशिवाय असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी त्यांच्या पत्नीला सोडून दुसरं लग्न केलं. मात्र माझ्या पतीने असं केलं नाही. ते संपूर्ण कुटुंबाला सोबत घेऊन पुढे जात आहेत.”