मुंबई: बिग बॉसचा 16 वा सिझन (Bigg Boss 16) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या सिझनची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. बिग बॉसचा नवा सिझन लाँच होण्याआधी 27 सप्टेंबर रोजी सलमान खानने (Salman Khan) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने पत्रकारांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर मोकळेपणे दिली. बिग बॉसच्या 16 व्या सिझनचा थीम ‘सर्कस’ असणार आहे. बिग बॉसच्या सूत्रसंचालनासाठी सलमानला किती मानधन (Fees) दिलं जातं, हा नेहमीच चर्चचा मुद्दा असतो. यावेळी सलमानने तब्बल 1000 कोटी रुपये घेतल्याची चर्चा होती. या चर्चांवरही त्याने उत्तर दिलं.
तगड्या मानधनाबद्दलच्या चर्चांवर उत्तर देताना सलमान म्हणाला, “माझ्या फी बद्दल ज्या काही चर्चा आहेत, त्या सर्व खोट्या आहेत. जर मला 1000 कोटी रुपये मानधन मिळालं तर मी आयुष्यात कधीच काम करणार नाही.”
“पण एक दिवस असा नक्कीच येईल, जेव्हा मला इतकं मानधन मिळेल. जरी मला इतकी फी मिळाली तरी माझा इतर खर्च भरपूर असेल, जसं की वकिलांचा खर्च, ज्यांची मला खूप गरज लागते. माझे वकील हे सलमान खानपेक्षा कमी नाहीत. माझी कमाईची रक्कम ही त्याच्या एक चतुर्थांशही नाही. आयकर आणि ईडी विभागानेही हे रिपोर्ट्स वाचले आहेत”, असं तो पुढे म्हणाला.
दरवर्षी बिग बॉसच्या शोमध्ये सूत्रसंचालक म्हणून परत येण्यास आवडत नसल्याचंही त्याने यावेळी स्पष्ट केलं. “अशीही वेळ असते, जेव्हा माझी खूप चिडचिड होते आणि मी चॅनलला सांगतो की मला हा शो होस्ट करायचा नाही. पण त्यांच्याकडेही पर्याय नसल्याने ते माझ्याकडे परत येतात. जर त्यांच्याकडे पर्याय असता तर त्यांनी खूप आधीच माझ्या जागी दुसऱ्या अभिनेत्याला आणलं असतं. माझी जागा घेण्यासाठी बरेच लोक तयार आहेत. पण चॅनल कधीच माझी जागा इतर कोणाला देणार नाही.”
बिग बॉसच्या शोमध्ये अनेकदा सलमानच्या रागाचा पारा चढल्याचं पहायला मिळतं. याविषयी तो म्हणाला, “होय, कधीकधी मला मर्यादा ओलांडून वागावं लागतं, कारण स्पर्धक त्यांची मर्यादा ओलांडतात. प्रेक्षकांना फक्त एक तासाचा एपिसोड पहायला मिळतो. जो एडिट केलेला असतो. पण खरा आणि संपूर्ण फुटेज आम्ही पाहतो. त्यामुळे मी इतका का रागावतो ते त्यांना कळत नाही. त्यांना फक्त एडिट केलेला भाग पहायला मिळतो. हे लोक उद्धटपणाची मर्यादा कशी ओलांडतात हे ते पाहू शकत नाही.”