छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि सर्वाधिक काळ चालणारी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मालिकेत जेठालाल गडाची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी आणि निर्माते असितकुमार मोदी यांच्यात सेटवर कडाक्याचं भांडण झाल्याची जोरदार चर्चा आहे. दिलीप जोशी हे त्यांच्या सुट्ट्यांबद्दल निर्मात्यांशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा असितकुमार यांनी संवाद टाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे संयमाचा बांध सुटलेल्या दिलीप यांनी असितकुमार यांची कॉलरच पकडली, असं म्हटलं जातंय. इतकंच नव्हे तर त्यांनी थेट मालिका सोडण्याचाही इशारा दिल्याचं कळतंय.
मालिकेशी संबंधित एका व्यक्तीने ‘टीव्ही 9 हिंदी डिजिटल’ली बोलताना काही गोष्टींचा खुलासा केला आहे. “भांडणं कुठे होत नाहीत? भांडणं प्रत्येक ठिकाणी होतात. कधी ती व्यावसायिक असतात तर कधी वैयक्तिक. मात्र असितकुमार मोदी आणि दिलीप जोशी या दोघांचं व्यक्तिमत्त्व असं नाही की ते एकमेकांवर हात उगारतील किंवा कॉलर पकडतील. मालिकेतील मुख्य कलाकार जेव्हा सुट्ट्या मागतो, तेव्हा तडजोड करावी लागते. न माझं न तुझं.. अशा नियमावर वागावं लागतं. त्याच चर्चेदरम्यान सेटवरील वातावरण थोड्या वेळासाठी गरम झालं होतं. मात्र नंतर ते प्रकरण शांत झालं. आता सर्वकाही ठीक आहे”, असं त्या व्यक्तीने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं आहे. या घटनेनंतर असितकुमार आणि दिलीप जोशी हे एकमेकांशी भेटले आणि सर्वसामान्यरित्या गप्पासुद्धा मारल्या, असंही त्यांनी म्हटलंय.
“हे दोघं बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांच्यात भावंडांसारखं नातं आहे. कोणीतरी छोट्याशा गोष्टीला वेगळं वळण देऊन मोठं करण्याचा प्रयत्न करत आहेत”, असंही संबंधित व्यक्तीने स्पष्ट केलं. ‘तारक मेहता..’मध्ये दिलीप जोशी यांच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट यांनी ‘नहीं यार’ असं म्हणत भांडणाच्या चर्चांना खोटं ठरवलंय. तर गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडेची भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवडकर यांनीसुद्धा या चर्चांना अफवा असल्याचं म्हटलंय. “हे सर्वकाही बकवास आहे. अशा अफवा कोण पसरवतंय काय माहित? आम्ही सर्वजण इथे खूप आनंदाने आणि शांतीने शूटिंग करत आहोत”, असं ते म्हणाले.