अभिनेता कार्तिक आर्यन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. कार्तिक त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल कधी मोकळेपणे बोलत नसला तरी एका भर पुरस्कार सोहळ्यात त्याची आई माला तिवारी यांनी मोठी हिंट दिली. तेव्हापासूनच त्याच्या गर्लफ्रेंडविषयी जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. नुकत्याच पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात कार्तिकच्या आईला त्यांच्या होणाऱ्या सुनेविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी मुलाच्या डेटिंग लाइफबद्दल मोठी हिंट दिली होती. “कुटुंबाची डिमांड ही एक चांगल्या डॉक्टरची आहे”, असं कार्तिकची आई म्हणाली. यावरूनच त्याच्या गर्लफ्रेंडची हिंट मिळाल्याचं नेटकरी म्हणत आहेत. तर कार्तिकची ही गर्लफ्रेंड प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री असल्याची चर्चा आहे. ती केवळ त्याच्यापेक्षा वयाने 11 वर्षांनी लहानच नाही तर ती दोन मुलांची आईसुद्धा आहे.
कार्तिकची गर्लफ्रेंड म्हणून ज्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला आहे. श्रीलीलाचा जन्म 14 जून 2001 मध्ये झाला. तिने तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. जुन्या विचारांच्या कुटुंबात श्रीलीलाचा जन्म झाला असला तरी तिने अभिनय क्षेत्रात स्वत:च्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्रीसोबतच ती वैद्यकीय शिक्षणसुद्धा घेत आहे. 2021 मध्ये एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण करण्याआधी तिने ‘किस’ या चित्रपटातून पदार्पण केलं. ती भरतनाट्यम डान्सरसुद्धा आहे.
2022 मध्ये श्रीलीलाने दोन दिव्यांग मुलांना दत्तक घेतलं. गुरू आणि शोभिता अशी त्यांची नावं आहेत. एका अनाथालयाला भेट दिल्यानंतर श्रीलीलाने त्यांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी श्रीलीलाची संपत्ती ही जवळपास 15 कोटींच्या आसपास आहे. सुरुवातीला ती एका चित्रपटासाठी चार लाख रुपये मानधन घ्यायची. परंतु ‘भगवंत केसरी’ या सुपरहिट चित्रपटानंतर तिने थेट दीड कोटींवर मानधन वाढवलं होतं. आता ती एका चित्रपटासाठी तीन ते चार कोटी रुपये स्वीकारते.
कार्तिक आणि श्रीलीला लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा नुकतीच झाली असून येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अद्याप या चित्रपटाचं नाव जाहीर करण्यात आलं नाही.