मुंबई | ४ ऑगस्ट 2023 : बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांचा पाली हिल येथील बंगला आता इतिहास जमा होणार आहे. दिलीप कुमार यांच्या बंगल्याचं रुपांतर ११ मजली आलिशान निवासी प्रकल्पात होणार आहे. दिलीप कुमार यांचा बंगला गेल्या अनेक वर्षांपासून असाच पडून आहे. बंगल्याच्या जागेवर अभिनेत्याच्या स्मरणार्थ संग्रहालयही बांधण्यात येणार असल्याची माहीती मिळत आहे. दिलीप कुमार यांचा हा बंगला अर्ध्या एकरात पसरलेला आहे. त्याचे बांधकाम क्षेत्र १.७५ चौरस फुटांपेक्षा जास्त आहे, ज्यावर ११ मजले बांधले जातील. अशी माहिती समोर येत आहे.
दिलीप कुमार यांचा पाली हिल येथील बंगला गेल्या काही वर्षांपासून कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. अभिनेत्याच्या कुटुंबियांनी एका बिल्डरवर त्यांची मालमत्ता ताब्यात घेण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप केला होता. अनेक वर्ष न्यायालयात खटला चालल्यानंतर २०१७ मध्ये बंगला दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांना मिळाला.
मिळालेल्या माहितीनुसार; दिलीप कुमार यांच्या बंगल्याचं रुपांतर ११ मजली आलिशान निवासी प्रकल्पात होणार असून त्यांचं संग्रहालयही बांधण्यात येणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निवासी प्रकल्पातून ९०० कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘Housing.com’ च्या रिपोर्टनुसार, २०२१मध्ये या बंगल्याची किंमत तब्बल ३५० कोटी रुपये होती. पण दिलीप कुमार यांचा बंगला आता इतिहास जमा होणार आहे.
दिलीप कुमार यांनी १९५३ साली संबंधीत बंगला कमरुद्दीन लतीफ नावाच्या व्यक्तीकडून फक्त १.४ लाख रुपयांमध्ये खरेदी केला होता. कमरुद्दीन लतीफ यांनी १९२३ मध्ये हा बंगला मुलराज खतयू नावाच्या व्यक्तीच्या कुटुंबाकडून ९९९ वर्षांच्या लिजवर घेतला होता. पण एका स्थानिक बिल्डरने बंगल्यावर स्वतःचा मालकी हक्क सांगितला होता. पण २०१७ पर्यंत बंगल्यावरून वाद सुरु होते. अखेर सायरा बानो यांनी बंगल्याचा मालकी हक्क मिळाला.
दिलीप कुमार यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ७ जुलै २०२१ मध्ये हिंदुजा रुग्णालयात निधन झालं. दिलीप कुमार यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर चाहते आणि सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला होता.