दिलीप प्रभावळकर रमले खास पत्राच्या आठवणीत

| Updated on: Jul 18, 2024 | 4:35 PM

‘हसवाफसवी’ हे नाटकं पहिल्यानंतर डॉ. श्रीराम लागू यांनी दिलीप प्रभावळकर यांना पत्र लिहिलं होतं. या पत्राच्या आठवणी आजही चांगलं काम करायला बळ देतात असं ते सांगतात. म्हणूनच त्यांनी नाट्यरसिकांसाठी खास पत्रप्रपंच आयोजित केला आहे.

दिलीप प्रभावळकर रमले खास पत्राच्या आठवणीत
दिलीप प्रभावळकर
Image Credit source: Tv9
Follow us on

‘माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं’ या खेळाच्या आठवणी अनेकांच्या स्मृतीरंजनात असतील. मात्र कालौघात हा खेळ हरवलाय आणि ते पत्रसुद्धा. एक छोटा कागदाचा कपटा, पण पत्रामध्ये, दोन शब्दांमध्ये, दोन रेषांमध्ये किती तरी अव्यक्त गोष्टी दडलेल्या असायच्या. हल्ली पत्रप्रपंच कमी झाला असला तरी काही पत्रांच्या आठवणींचा दरवळ मात्र मनात चिरंतन दरवळतो. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना डॉ. श्रीराम लागू यांनी लिहिलेल्या पत्राचा दरवळ आणि त्याची आठवण आजही दिलीप प्रभावळकर यांच्या मनात रुंजी घालतायेत.

डॉ. श्रीराम लागू यांचं पत्र

‘हसवाफसवी’ हे नाटकं पहिल्यानंतर डॉ. श्रीराम लागू यांनी दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचं कौतुक करण्यासाठी पत्र लिहिलं होतं. या पत्राच्या आठवणी आजही चांगलं काम करायला बळ देतात असं सांगताना, नाट्यरसिकांसाठी दिलीप प्रभावळकर यांनी खास पत्रप्रपंच आयोजित केला आहे. त्याला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. दिलीप प्रभावळकर लिखित ‘पत्रा पत्री’ या नावीन्यपूर्ण अभिवाचनाचे प्रयोग सध्या जोरदार सुरु आहेत. यासाठी ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांची त्यांना साथ लाभली आहे. आणि आज पत्रात्मक संवाद कालौघात मागे पडलेला असताना बदामराजा प्रोडक्शन्स निर्मित ‘पत्रा पत्री’ हा रंगाविष्कार मंचावर येणं नाट्यरसिकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळणे हे निश्चितच उत्सुकता वाढवणारं आहे. माधुरी गवांदे, निनाद कर्पे याचे निर्माते आहेत.

हे सुद्धा वाचा

‘पत्रा पत्री’चा प्रयोग

दिलीप प्रभावळकर याविषयी म्हणाले, “पत्रलेखनामधील ओलावा आणि आपलेपणाची अनुभूती रसिकांना देण्यासाठी ‘पत्रा पत्री’ चा प्रयोग करण्याचं ठरवलं. ‘प्रासंगिक आणि विडंबनात्मक पद्धतीचं लेखन या पत्रांमध्ये आहे. प्रत्येक पत्राला एक कथा आहे. अशा पाच कथा आम्ही अभिवाचनासाठी निवडल्या आहेत.” तात्यासाहेब आणि माधवराव या व्यक्तिरेखा बनून अनुक्रमे दिलीप प्रभावळकर, विजय केंकरे पत्रांचं अभिवाचन करत आहेत. या ‘दृक आविष्कारा’चं दिग्दर्शन विजय केंकरे यांचं असून रंगावृत्ती नीरज शिरवईकर यांची आहे. संगीत अजित परब यांचे आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे