अभिनेत्री डिंपल कपाडियाने सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी लग्न केल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीतील करिअरला रामराम केला. 1970 मध्ये राजेश खन्ना यांच्याशी लग्न करताना ती फक्त किशोरवयीन होती. तर राजेश खन्ना हे तिच्यापेक्षा दुप्पट वयाचे होते. लग्नानंतरच्या काही वर्षांनंतर या दोघांच्या नात्यात अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या. त्याच वेळी राजेश खन्ना यांच्या करिअरलाही उतरती कळा लागली होती. 1980 मध्ये डिंपलने त्यांना सोडलं आणि पुन्हा अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. या दोघांच्या नात्यात कटुता असतानाही खन्ना जेव्हा राजकारणात आले, तेव्हा डिंपलने त्यांची साथ दिली आणि 1990 मध्ये ‘जय शिव शंकर’ या चित्रपटातही त्यांच्यासोबत काम केलं होतं.
‘रेडिफ’ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत डिंपल तिच्या या निर्णयांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. ‘जय शिव शंकर’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा राजेश खन्ना यांच्यासोबत काम करण्याविषयीही तिने सांगितलं होतं. ती म्हणाली, “चित्रपट चांगला होता, पण त्यात काही आर्थिक समस्या निर्माण झाल्या होत्या. एकदा आम्ही शूटिंग करताना त्यांची तब्येत बरी नव्हती आणि त्यांना बाल्कनीमध्ये येऊन माध्यमांना अभिवादन करायचं होतं. तेव्हा मी त्यांना शॉल आणि गॉगल दिला. त्यांना मी म्हटलं की, ‘काकाजी, जेव्हा तुम्ही बाहेर जाल, तेव्हा सरळ बघू नका, तुमची साइड प्रोफाइल चांगली दिसते.’ त्यानंतर त्यांनी माझ्याकडे रागात पाहिलं आणि म्हणाले, ‘आता तू मला शिकवशील का?’ ते ऐकून मी घाबरले आणि हात जोडून त्यांची माफी मागितली.”
राजेश खन्ना यांचा करिअरमधील पडता काळ स्वत:च्या डोळ्यांनी पाहिल्याचं डिंपलने अनेकदा सांगितलं होतं. “आयुष्यात मी पहिल्यांदाच अपयश माझ्या डोळ्यांसमोर बघत होते. जेव्हा एखाद्या यशस्वी व्यक्तीच्या यशाचे तुकडे होतात, तेव्हा त्यांची निराशा आजूबाजूचा संपूर्ण परिसर व्यापून टाकते. तो काळ खूप विचित्र आणि वाईट होता. जेव्हा राजेश आठवड्याअखेर बॉक्स ऑफिस कलेक्शनचा आकडा जाणून घेण्यासाठी प्रतीक्षा करायचे, तेव्हा लोकांना त्यांच्यासमोर जाऊन ते आकडे सांगण्याची हिंमतच नसायची”, असं तिने ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.
2019 मध्ये एका कार्यक्रमात डिंपल तिची मुलगी ट्विंकल खन्नाविषयी व्यक्त झाली होती. “आम्ही विभक्त झालो तेव्हा ती फक्त सात ते आठ वर्षांची होती. पण त्या वयातही तिच्यात खूप समजूतदारपणा होता. तिला फक्त माझी काळजी घ्यायची होती. मी ठीक आहे का, याची खात्री तिला हवी होती. त्यावेळी खूप गोष्टी घडल्या होत्या, त्या मी इथे सांगूही शकत नाही.”