मुंबई: अभिनेता अक्षय कुमारने महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या बहुचर्चित चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या अत्यंत महत्त्वपूर्ण दिवशी शूटिंगला जाण्याआधी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांपुढे हात जोडले. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अक्षयने शूटिंगला सुरुवात करत असल्याची माहिती दिली. या चित्रपटात अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय.
‘आज मराठी चित्रपट वेडात मराठे वीर दौडले सात याच्या शूटिंगला सुरुवात करतोय. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणं म्हणजे माझं सौभाग्य आहे. मी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आणि आई जिजाऊ यांच्या आशीर्वादाने माझे पूर्ण प्रयत्न करेन. माझ्यावर आशीर्वाद राहू द्या’, अशी पोस्ट अक्षयने लिहिली. त्याचसोबत शिवरायांना वंदन करतानाचा फोटो पोस्ट केला.
या चित्रपटात अक्षय कुमारसोबत जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दीक जोशी, सत्या, अक्षय, नवाब खान आणि प्रवीण तरडे यांच्याही भूमिका आहेत. महेश मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट 2023 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा चार भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर त्यावरून खूप मोठा वाद निर्माण झाला होता. या चित्रपटात चुकीचे संदर्भ असून चुकीची नावं, तसंच मावळ्यांची वेशभूषादेखील चुकीची असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनीसुद्धा या चित्रपटाला विरोध दर्शवला होता.
“मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही राज ठाकरेंमुळे मिळाली. त्यांनी मला आश्वासन दिलं की तू ही भूमिका साकारू शकतोस. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. या भूमिकेसाठी मी माझं सर्वस्व अर्पण करेन”, असं वक्तव्य अक्षयने चित्रपटाच्या घोषणेदरम्यान केलं होतं.