‘बिग बॉस ओटीटी’ या शोची विजेती आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्या अगरवालने 20 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रीयन पद्धतीने बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकरशी लग्न केलं. मात्र आता अवघ्या तीन महिन्यांतच या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. नुकतेच हे दोघं हनिमूनला गेले होते. हनिमूनवरून परत येताच दिव्या आणि अपूर्वने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर एकमेकांसोबतचे सर्व फोटो काढून टाकले आहेत. दिव्याने अपूर्वसोबतच्या लग्नाचेही फोटो इन्स्टाग्रामवर काढून टाकले आहेत. तिच्या इन्स्टा फीडवर आता फक्त तिच्या खासगी फोटोशूटचे आणि इतर प्रोजेक्ट्सशी संबंधित पोस्ट आहेत. यामुळे या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचं म्हटलं जात आहे. तर काहींनी हा पीआर स्टंट असल्याचाही अंदाज वर्तवला आहे. अपूर्वनेही त्याच्या सोशल मीडिया पेजवरून दिव्यासोबतचे लग्नाचे फोटो काढून टाकले आहेत. मात्र इतर काही फोटो त्याच्या इन्स्टा फीडवर पहायला मिळत आहेत.
दिव्या अगरवालने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. ‘मिस नवी मुंबई’ या सौंदर्यस्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यानंतर आयोजकांनी तिची भेट अपूर्वशी करून दिली होती. या पहिल्या भेटीतच दिव्याला अपूर्व आवडला होता आणि दुसऱ्या भेटीदरम्यान तिने थेट लग्नाची मागणी घातली. मात्र अपूर्व या नात्याबद्दल संभ्रमात होता. लग्नासाठी अद्याप तयार नसल्याचं सांगत त्याने दिव्याला थोडा काळ प्रतीक्षा करण्याचा पर्याय दिला होता. दिव्याचं नाव वरुण सूदशीही जोडलं गेलं होतं. मात्र या दोघांचंही नातं फार काळ टिकू शकलं नाही.
डिसेंबर 2022 मध्ये दिव्याने अपूर्वसोबत साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले. दिव्याच्या वाढदिवशी अपूर्वने तिला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. जवळपास सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. फेब्रुवारी महिन्यात मुंबईत दिव्या आणि अपूर्वशी मराठमोळ्या पद्धतीने लग्न केलं होतं. “मला कधीच लग्न करायचं नव्हतं. माझा लग्नसंस्था या संकल्पनेवर विश्वास नाही. पण दिव्यासाठी मी लग्न करेन. मला माझं आयुष्य तिच्यासोबत घालवायचं आहे”, असं अपूर्व एका मुलाखतीत म्हणाला होता.