‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दिव्यांकाचा पती विवेक दहिया याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. दिव्यांकाच्या पीआर टीमनेही तिच्या अपघाताविषयी पोस्ट लिहिली आहे. काही तासांपूर्वीच दिव्यांकाचा अपघात झाला असून तिच्या हाताची दोन हाडं तुटल्याचं त्यांनी सांगितलं आहे. विवेकने दिव्यांकाच्या हाताचा एक्स-रेसुद्धा पोस्ट केला आहे. ही पोस्ट पाहून चाहत्यांनी दिव्यांकाबद्दल काळजी व्यक्त केली आहे. तिच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून हा अपघात कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झालं नाही.
विवेकच्या पीआर टीमने सोशल मीडियावर लिहिलं, ‘आम्हाला हे सांगताना खूप दु:ख होतंय की विवेकचा उद्याचा लाइव्ह सेशन पुढे ढकलण्यात आला आहे. काही तासांपूर्वीच त्याची पत्नी दिव्यांकाचा अपघात झाला आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिव्यांकाची काळजी घेण्यासाठी विवेक तिच्यासोबतच आहे. या काळात तुम्ही सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे.’ इन्स्टाग्रामच्या स्टोरीमध्ये दिव्यांकाच्या हाताचा एक्स-रे पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये तिच्या हाताची दोन हाडं तुटल्याची दिसत आहेत. ‘दिव्यांका मॅमच्या हाताची दोन हाडं तुटली आहेत आणि उद्या तिच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे. डॉक्टर तिची पूर्णपणे काळजी घेत आहेत’, असं त्यावर लिहिलं आहे.
दिव्यांका सध्या ‘अदृश्यम’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये ती अंडरकव्हर एजंटची भूमिका साकारतेय. त्यामुळे या मालिकेच्या शूटिंगदरम्यान तिला दुखापत झाली असावी, असा अंदाज काहीजण व्यक्त करत आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लिगामेंट टिअरमुळे (ligament tear) दिव्यांकावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा दिव्यांका दुखापतग्रस्त झाली आहे.
दिव्यांकाने ‘बनू मैं तेरी दुल्हन’, ‘ये है मोहब्बतें’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘नच बलिये 8’ या डान्स शोची ती विजेती ठरली. 2021 मध्ये तिने ‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी 11’मध्ये भाग घेतला होता. यामध्ये ती रनर अप ठरली होती. दिव्यांकाने तिच्या करिअरची सुरुवात ऑर इंडिया रेडिओमध्ये अँकर म्हणून केली होती. 2016 मध्ये तिने अभिनेता विवेक दहियाशी लग्न केलं.