‘दिया और बाती’ या मालिकेत संध्या राठी या संस्कारी सुनेची भूमिका साकारलेली अभिनेत्री दीपिका सिंह सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. दीपिका मालिकेत जरी सोज्वळ आणि साधी दिसली तरी खऱ्या आयुष्यात मात्र तिचा लूक पूर्णपणे वेगळा आहे. दीपिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती सतत तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र यात सर्वाधिक चर्चा होते, ती म्हणजे दीपिकाच्या डान्सची. इन्स्टाग्राम रीलमध्ये ट्रेंड होत असलेल्या विविध गाण्यांवर ती डान्सचे व्हिडीओ शूट करून पोस्ट करते. पण आपल्या या डान्समुळे ती ट्रोलर्सनाही आमंत्रण देते. दीपिकाला तिच्या डान्सबद्दल प्रचंड ट्रोल केलं जातं. आता तिचा नवीन व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा डोक्याला हात लावला आहे.
दीपिकाने इन्स्टाग्रामवर ट्रेंडमध्ये असलेल्या ‘यिम्मी यिम्मी’ या गाण्यावर डान्स केला आहे. पिवळ्या रंगाची साडी नेसून दीपिकाने या व्हिडीओत दिलखुलास डान्स केला आहे. मात्र तिचा हा डान्स खूप हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. माझ्या स्टाइलमध्ये ट्रेंड फॉलो करतेय, असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर एकाने लिहिलं, ‘असा कोणता नाईलाज होता, ज्यामुळे हा व्हिडीओ पोस्ट करावा लागला?’ तर दुसऱ्या युजरने तिच्या डान्सची खिल्ली उडवली आहे. ‘आता पुरे कर.. तुझा डान्स बघत नाही’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.
‘इतका वाईट डान्स आजवर पाहिला नव्हता’ अशा शब्दांत युजर्सने दीपिकावर टीका केली आहे. आपल्या डान्समुळे ट्रोल होण्याची दीपिकाची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही दीपिकाला तिच्या डान्समुळे अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता ती सोशल मीडियावर डान्सचे विविध व्हिडीओ पोस्ट करताना दिसते.
दीपिकाने 2011 मध्ये ‘दिया और बाती हम’ या स्टार प्लस वाहिनीवरील मालिकेतून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केलं. यामध्ये तिने संध्याची भूमिका साकारली होती. ही मालिका तब्बल पाच वर्षे चालली होती. अखेर सप्टेंबर 2016 मध्ये या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर 2018 मध्ये ती ‘द रिअल सोलमेट’ या वेब सीरिजमध्ये झळकली.